हिंदुस्थान इंडोनेशियात इतिहास रचणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

इंडोनेशियामध्ये 18 ऑगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असून यावेळी हिंदुस्थानचे 572 खेळाडूंचे पथक 36 क्रीडा शर्यतींमध्ये पदकांची लयलूट करून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. हिंदुस्थानी संघ 1986 सालानंतर म्हणजेच 32 वर्षांनंतर सर्वाधिक पदके पटकावणाऱया अव्वल पाच देशांच्या यादीत धडक मारण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. याचसोबत 2010 सालामध्ये ग्वांझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वाधिक 65 पदकांना मागे टाकण्यासाठीही प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल हे विशेष!

10 टक्के पदकांची संख्या

गेल्या चार आशियाई क्रीडा स्पर्धांवर नजर टाकता हिंदुस्थानच्या खेळाडूंनी पथक संख्येच्या तुलनेत फक्त 10 टक्केच पदकांची कमाई केलेली दिसून येत आहे. 2002 सालामध्ये बुसान येथे झालेल्या स्पर्धेत तर फक्त 35 पदकांची कमाई हिंदुस्थानला करता आली होती. 1990 सालामध्ये बीजिंग येथे झालेल्या स्पर्धेत हिंदुस्थानकडून सर्वात सुमार कामगिरी झालीय. यामध्ये देशाला फक्त 23 पदकेच जिंकता आली आहेत.

जकार्तामध्येही फक्त 12 टक्केच पदकांची अपेक्षा

जकार्ता, पालेमबांग येथे 18 ऑगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार असून यामध्ये 572 खेळाडूंचे हिंदुस्थानी पथक पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. यावेळी हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी यंदा हिंदुस्थानचा संघ 65 ते 70 पदके जिंकेल, असा विश्वास व्यक्त केलाय. याचाच अर्थ यंदाही हा संघ मोठी झेप घेणार नाही. एकूण पथकाच्या 12 टक्के पदके जिंकण्याची क्षमता हिंदुस्थानच्या चमूत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.