
हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी पथकाने पदकांचे शतक ठोकण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. यंदा क्रिकेटने पुनरागमन केले असून प्रथमच हिंदुस्थानने आपले दोन्ही संघ सोनं जिंकण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असून बुद्धिबळानेही 13 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. यातही हिंदुस्थानचेच वर्चस्व राहणार हे निश्चित आहे.
गेल्या वेळी जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना 16 सुवर्णांसह 70 पदके जिंकून नवा इतिहास रचला होता. आता तो विक्रम मोडण्याची तयारी हिंदुस्थानी पथकाकडून झाली आहे. यावेळी हिंदुस्थानला ऍथलेटिक्स, कुस्ती आणि नेमबाजीकडून मोठी अपेक्षा आहेच, हेच खेळ हिंदुस्थानची निम्मी पदके जिंकण्याची क्षमता राखून आहेत. त्याचबरोबर क्रिकेटमध्येही हिंदुस्थानचाच दबदबा असल्यामुळे ही दोन्ही सुवर्ण हिंदुस्थानचीच असतील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
ऍथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस
जकार्तामध्येही हिंदुस्थानला सर्वाधिक पदके ऍथलेटिक्सनेच जिंकून दिली होती. यावेळी गेल्या स्पर्धेपेक्षा मोठे पथक रवाना होणार असून या क्रीडा प्रकारात किमान 30 पदकांची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. या क्रीडा प्रकारात हिंदुस्थानी खेळाडू जितकी जोरदार कामगिरी करतील, तितकाच हिंदुस्थानी पथकाचा पदकांचा आकडा मोठा होईल. यंदा 40 क्रीडा प्रकारांसाठी 655 खेळाडूंचे पथक हांगझाऊला जाणार असून यात सर्वाधिक 68 ऍथलीटस् आहेत. जकार्तात 36 पैकी 18 प्रकारात हिंदुस्थानी खेळाडूंनी पदके जिंकली होती. यंदा तर किमान 25 क्रीडा प्रकारात पदके जिंकण्याची तयारी हिंदुस्थानी पथकाने केली आहे.
बुद्धिबळातही सोने
2006 साली दोहा आशियाई स्पर्धेनंतर बुद्धिबळ आशियाई स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता. मात्र पुन्हा एकदा या खेळाला स्पर्धेत स्थान मिळाले असून ही बाब हिंदुस्थानसाठी फायद्याची ठरणार आहे. सध्या हिंदुस्थानचे प्रग्नानंदा, गुकेश, अर्जुन आणि विदीतसारखे दिग्गज बुद्धिबळपटू अवघ्या जगात हिंदुस्थानचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे या खेळातही हिंदुस्थानसमोर अन्य कुणाचेही आव्हान टिकणार नाही.
ब्रेक डान्सिंग खेळ?
आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेक डान्सिंग या खेळाला स्थान लाभल्यामुळे यंदा हांगझाऊलामध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या खेळासाठी हिंदुस्थानचा एकही खेळाडू नसेल. टीकाकारांनी या खेळाला विरोध केल्यामुळे गेला काही काळ याबाबत वाद सुरू होते. तरीही ऑलिम्पिक समितीने ब्रेक डान्सिंगला खेळाचा दर्जा दिला आहे. हा खेळ नियमात बसत नसल्यामुळे केंद्र सरकारने आपला संघ पाठवलेला नाही.