आशियाई स्पर्धा अन् खो-खो लीगचे वेळापत्रक कोलमडले, चंद्रजित जाधवांची निराश प्रतिक्रिया

350

कोरोनाचा फटका इतर खेळांप्रमाणे खो-खो या खेळालाही बसला. महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाचा समावेश आशियाई गेम्समध्ये होण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याअंतर्गत नवी दिल्लीत आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. तसेच ऑक्टोबर महिन्यात अल्टिमेट खो-खो लीगचा थरार तमाम क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार होता, पण या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धा तूर्त स्थगित करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी हिंदुस्थानी खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत खो-खोशी निगडित सर्व बाबींवर आपली मते व्यक्त केली. तसेच महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे खेळाडूंसह सर्व संघटकही कमालीचे नाराज झाले असून नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी निराश प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

परदेशी खेळाडूंची सर्व व्यवस्था केली
नवी दिल्लीत आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. त्याआधी हिंदुस्थानी खेळाडूंच्या तसेच परदेशातील खेळाडूंच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचदरम्यान लॉकडाऊन करण्यात आले. तिथपासून परदेशातील खो-खोपटू नवी दिल्लीत अडकून होते. जुलै महिन्यात सर्वांना आपापल्या देशात पाठवण्यात आले, पण या कालावधीत परदेशी खेळाडूंच्या राहण्याची तसेच निवासाची सर्व व्यवस्था हिंदुस्थानी खो-खो महासंघाकडून करण्यात आली, असे चंद्रजित जाधव यावेळी म्हणाले.

आता लक्ष्य आशियाई गेम्स
खो-खो खेळाला ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी कोणते प्रयत्न करताहेत? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे, पण आम्ही सर्वात आधी आशियाई गेम्समध्ये या खेळाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. हिंदुस्थानात आशियाई स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये 14 ते 18 देश सहभागी व्हावेत यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे या खेळाचे आशियाई स्तरावरील भविष्य उज्ज्वल असेल, असे चंद्रजित जाधव आत्मविश्वासाने सांगतात.

खो-खोच्या सरावाला ग्रीन सिग्नल दाखवायला हरकत नाही
बॅडिंमटन, टेनिस या खेळांच्या सरावाला परवानगी देण्यात आली आहे. बॅडिंमटनमध्ये शटलकॉक व टेनिसमध्ये चेंडू यामुळे संसर्ग होऊ शकतो, पण तरीही या खेळांच्या सरावाला थम्स अप दाखवण्यात आला आहे. खो-खोमध्ये सराव करताना खेळाडू प्रतिस्पध्र्याला बाद करताना त्याच्या मागच्या बाजूला हात लावतो. त्यामुळे हा खेळ पूर्णपणे सुरक्षित आहे. बॉडी कॉण्टॅक्टही तेवढ्या प्रमाणात होत नाही. आता स्पर्धेबाबत बोलत नाही, फक्त सरावापुरते बोलत आहे, असे चंद्रजित जाधव म्हणाले.

महाराष्ट्राची झेप
2010 ते 2020 या कालावधीत महाराष्ट्राच्या संघाने सर्व प्रकारच्या वयोगटांत पदकांची कमाई केलीय. त्यामुळे या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राने खो-खो या खेळामध्ये मोठी झेप घेतलीय असे म्हणायला हरकत नाही. तसेच महाराष्ट्रातील खो-खोपटूंना सरकारी नोकऱ्याही मिळू लागल्या आहेत. महसूल, पोलीस, महावितरण यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी खेळाडू नोकरी करताना दिसत आहेत, असे सांगताना चंद्रजित जाधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

आपली प्रतिक्रिया द्या