
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना चांगलेच फटकारले आहे. कुवेतमधील हिंदुस्थानी प्रवासी समुदायाला संबोधित करताना, ओवैसी म्हणाले की, चीनच्या लष्करी सरावाचा जुना फोटो हिंदुस्थानवरील विजय म्हणून मिरवत असल्याबाबत पाकिस्तानचे जगभरात हसे होत असल्याचे ते म्हणाले. ही घटना हास्यास्पद आहेत, तसेच पाकिस्तानच्या धास्तावल्याचे आणि त्यांच्या अपयशाचे प्रतीक आहे. कोणत्याही गोष्टीची कॉपी करण्यासाठीही अक्कल लागते, अशा शब्दांत त्यांनी मुनीर यांचा समाचार घेतला आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक फोटो भेट दिला. त्यांनी 2019 मध्ये चिनी सैन्याच्या कवायतीचा फोटो दिला आणि म्हटले की हा हिंदुस्थानवरील विजयाचा पुरावा आहे. हे पाकिस्तानचे वास्तव आहे. कॉपी करण्यासाठीही अक्कल लागते आणि त्यांच्याकडे ती नसल्याचे यातून दिसून येते. पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या प्रचारापासून सावध राहण्याचा इशाराही ओवेसी यांनी दिला. पाकिस्तान जे काही म्हणत आहे त्यावर विश्वास ठेवू नये, असे ते म्हणाले.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक फ्रेम केलेला फोटो भेट दिला आणि दावा केला की हा फोटो हिंदुस्थानी लक्ष्यांवर पाकिस्तानी हल्ल्याचा आहे. पण लवकरच हे उघड झाले की हा फोटो 2019 मध्ये झालेल्या चिनी लष्करी सरावातील आहे, ज्यामध्ये PHL-03 मल्टिपल रॉकेट लाँचर दाखवण्यात आले आहे. हा फोटो चिनी छायाचित्रकार हुआंग है यांनी काढला होता आणि गेल्या पाच वर्षांत विविध माध्यमांमध्ये तो अनेक वेळा वापरला गेला आहे. असे असूनही, पाकिस्तानी सैन्याने ते हिंदुस्थानवरील विजय म्हणून तो फोटो मिरवत आहेत, हे हास्यास्पद आहे.
ओवैसी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानला पुन्हा FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचे आवाहन केले. यामागील स्पष्ट कारणेही त्यांनी दिली. ते म्हणाले, एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट झाल्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवहारांवर कडक देखरेख ठेवली जाते. पाकिस्तान हवाला आणि मनी लाँड्रिंगद्वारे मध्य पूर्वेतील हिंदुस्थानविरुद्ध दहशतवादी गटांना निधी पुरवतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला दिलेले 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज थेट त्यांची लष्करी व्यवस्था आणि दहशतवादी नेटवर्क मजबूत करण्यासाठी वापरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे एफएटीएफकडून देखरेख आवश्यक आहे कारण हे पैसे पाकिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर दहशतवादात वापरले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.