पाकिस्तानमध्ये होणार सत्तापालट? लष्करप्रमुख असीम मुनीर नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता

पाकिस्तानात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, देशात लवकरच सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना त्यांच्या पदावरून हटवले जाऊ शकते, असे दावे केले जात आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे झरदारी यांना हटवण्याच्या तयारीत असून, स्वतः राष्ट्राध्यक्षपद स्वीकारण्याची शक्यता आहे.

वृत्तानुसार, असीम मुनीर यांनी सत्तापालटाची तयारी सुरू केली आहे. यामागे 5 जुलै रोजीच्या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी आहे, जेव्हा 47 वर्षांपूर्वी जनरल झिया-उल-हक यांनी 1977 मध्ये सत्तापालट केला होता. या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडामोडींमुळे जनतेत चिंतेचे वातावरण आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी अलिकडेच आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जनरल मुनीर यांच्यावर टीका केली होती. त्यांनी दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना हिंदुस्थानला सोपवण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आणि हाफिज सईदच्या मुलाने यावर स्पष्टीकरण दिले. यानंतर सत्तापालटाविरोधी भावना समाजात पसरू लागल्या आहेत, असं बोललं जात आहे.

काही वृत्तानुसार, जनरल मुनीर यांचा उद्देश केवळ राष्ट्राध्यक्षपद मिळवणे हा नसून, पंतप्रधान शहबाज शरीफ यांना हटवून संपूर्ण सत्ता आपल्या हाती घेण्याचा आहे. यासाठी ते घटनात्मक बदलांची तयारी करत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात लष्कराने अनेकदा सत्ता हस्तगत केली आहे. 1999 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवले होते. सध्याच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा लष्करी हस्तक्षेपाची भीती व्यक्त केली जात आहे.