>> अस्मिता प्रदीप येंडे
आपल्या समाजात बऱ्यापैकी स्त्री-पुरुष समानता दिसून येत असली तरी पुरुषप्रधान संस्कृतीची तत्त्वे पूर्णपणे बदललेली नाही. आजकाल बऱयाच महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ज्या क्षेत्रात फक्त पुरुषांची मत्तेदारी होती, तिथेही स्त्रिया पाय रोवून सक्षमतेने उभ्या आहेत. आपल्या जबाबदाऱया, कर्तव्ये सांभाळून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहेत. शहरी भागात स्त्रियांना तशा संधी उपलब्ध होतात पण ग्रामीण भागातील स्त्रियांचे आयुष्य तितकेसे सोपे नाही. चूल आणि मूल या पलिकडे त्यांचे अस्तित्व उरत नाही. विवाहापूर्वी मुली खूप उत्साहाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी उच्च शिक्षण घेतात पण विवाहानंतर आणि मूल झाल्यावर त्यांची ध्येय, स्वप्न, आकांक्षा यांची राख होते, त्यांची प्रगती तिथेच थांबते. कौटुंबिक जबाबदाऱया आणि कर्तव्ये पार पाडताना आपले स्वतचे एक जग आहे, याची जाणीव त्या हरवतात. यामागे कारणीभूत आहे, समाजाची मानसिकता.
ही मानसिकता बदलेल तेव्हा बदलेल. पण स्वतचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे. लेखक श्रीनिवास सावंत यांचे ‘गोष्ट नव्या वयाची‘ हे पुस्तक स्वप्रतिमा कशा प्रकारे निर्माण करावी, आपले स्वतंत्र अस्तित्व कसे विकसित करावे, याचे कृतीयुक्त मार्गदर्शन करणारे आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे. काही गोष्टी या वयाच्या विशिष्ट टप्प्यात व्हायला लागतात. पण जेव्हा एखादी स्त्री स्वतच्या पायावर उभे राहून या गर्दीत स्वतचे वेगळे स्थान प्रस्थापित करते तेव्हा, तो तिचा नवा जन्मच असतो. त्यामुळे उत्कर्षाच्या टप्प्याकडे जाणारा जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे ‘गोष्ट नव्या वयाची.’ ज्या स्त्रियांना कौटुंबिक जबाबदाऱया, घर-संसारातील अडचणी, आर्थिक-मानसिक परिस्थिती वा आत्मविश्वास नसल्याने आपली स्वप्ने, इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत, त्या महिलावर्गासाठी हे पुस्तक आत्मिक बळ देणारे आहे, मनात पुन्हा नवा ध्यास, आत्मविश्वास निर्माण करणारे आहे.
‘गोष्ट नव्या वयाची’मधल्या शमिका आणि अस्मिता अशा दोन स्त्राr पात्रांच्या माध्यमातून लेखकाने स्वयंविकासाच्या विविध पायऱया अगदी सोप्या स्पष्टीकरणासहित मांडल्या आहेत. पुस्तकात एकूण 17 प्रकरणे असून व्यक्तिमत्त्व विकासासाठी, आपले करिअर घडवण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत, त्याची प्राथमिक माहितीसुद्धा दिलेली आहे. पुस्तकाची तृतीय पुरुषी निवेदनशैली असली तरी शमिका आणि अस्मिता या पात्रांच्या संवादातून हे पुस्तक अधिकाधिक उमगत जाते.
शमिका आणि अस्मिता या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी पण बऱयाच वर्षांनी जेव्हा अचानक भेटतात तेव्हा एकमेकींमध्ये झालेला बदल पाहून त्या अवाक होतात. अस्मिता ही आधुनिक जीवनशैलीने जगणारी, एका कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर काम करणारी, आर्थिक स्वातंत्र्य असणारी आणि आत्मविश्वासाने जगणारी आधुनिक स्त्री तर शमिका घर-संसार सांभाळणारी गृहिणी. एका ठरावीक टप्प्प्यानंतर शमिकाला जाणवते, की आपण संसार सांभाळताना स्वतच्या गरजा, इच्छांचा विचार केला नाही. तेव्हा अस्मिताच्या अचानक झालेल्या भेटीनंतर सुरु होतो शमिकामध्ये दडलेल्या क्षमतांना ओळखण्याचा प्रवास. हे पुस्तक फक्त स्त्रियांसाठीच नाही तर आत्मविश्वासाने जीवन जगण्याची, व्यक्तित्व सुधारण्याची आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवण्याची इच्छा बाळगणाऱया प्रत्येकासाठी आहे.
गोष्ट नव्या वयाची – लेखसंग्रह
लेखक ः श्रीनिवास सावंत
प्रकाशक ः सायली क्रियेशन्स
मूल्य ः 200 रुपये