
गोव्याच्या श्रृंगी बांदेकर हिने २०० मी. मिडले व बँक स्ट्रोक, ४०० मी. मिडले प्रकारात अव्वल क्रमांक पटकावत अस्मिता महिला स्विमिंग लीग स्पर्धेत तिहेरी मुकुट संपादन केला.
पुणे जिल्हा हौशी अॅक्वेटिक संघटनेच्या (पीडीएएए) वतीने खेलो इंडिया व साई यांच्या मान्यतेखाली बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत २००मी मिडले प्रकारात खुल्या महिला गटात गोव्याच्या श्रृंगी बांदेकर हिने ०२.३४.०१ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या झारा बक्षी (०२.३७.५५ से.) व यशवी खरात (०२.३८.६७ से.) यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. २०० मी. बँक स्ट्रोकमध्ये श्रृंगी बांदेकर (०२.३८.३६ से.) हिने प्रथम स्थान पटकावले. ४०० मी. मिडलेमध्ये श्रृंगी बांदेकर हिने ०५.३०.६० सेकंद वेळ नोंदवत पहिले स्थान मिळवले.
२०० मी फ्री-स्टाइलमध्ये १८ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या त्विशा दीक्षितने ०२.२०.४४ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. २०० मी. मिडलेमध्ये त्विशा दीक्षितने ०२.३७.४० सेकंद वेळ नोंदवून विजेतेपदाचा मान पटकावला. ५० मी. बटरफ्लाय प्रकारात १८ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या श्रीलेखा पारीख हिने ३०.५५ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाला गवसणी घातली. ५० मी. फ्री स्टाइलमध्येदेखील श्रीलेखा पारीखने २८.८५ सेकंद वेळ नोंदवून या गटातील जेतेपदाबरोबरच दुहेरी मुकुट मिळवला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक कर्नल अनुराग सूद, अर्जुन पुरस्कारविजेत्या ऑलिम्पिक हॉकीपटू रेखा भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालिका नीता तळवळीकर, बाळासाहेब कुलकर्णी, रमेश विपट आदी मान्यवर उपस्थित होते.
























































