
>> अस्मिता येंडे
मानवी जीवन हे अनुभवांनी व्यापलेले आहे. क्षणोक्षणी शिकण्याची संधी आपल्याला लाभत असते. सुखदुःखाच्या लाटा सतत उचंबळत राहतात, पण आपण ठामपणे उभे रहायचे असते ही शिकवण आयुष्य जगताना मिळते, तेही अगदी शेवटपर्यंत. मनुष्य हा एकांगी राहू शकत नाही. सुख असो वा दुःख, ते व्यक्त करण्यासाठी दुसऱया व्यक्तींची गरज भासते. आपल्याला जे माहीत आहे ते इतरांना सांगण्याची धडपड माणूस सतत करत राहतो.
व्यवसायाने इंजिनीअर व सॉफ्टवेअर ट्रेनिंग देणारे लेखक अमोल निरगुडे ऊर्फ अनिर यांच्या वाचनाची बीजे शालेय जीवनापासून त्यांच्या संवेदनशील मनात रुजली गेली. जगण्याच्या या विविध पायऱयांवर निरनिराळे अनुभव आले. विभिन्न स्वभावाची माणसं भेटली. या एकूण प्रवासात लेखकाला जगण्याचे जे तत्त्वज्ञान उमगले, ते इतरांना सांगावे या हेतूने लेखकाने एक नवेकोरे पुस्तक रसिक, जाणकार वाचकांसाठी लिहिले आहे.
लेखक अमोल निरगुडे लिखित ‘झटपट करोडपती कसे व्हावे!’ हे पुस्तक मनोरंजनाच्या माध्यमातून जगण्याचे तत्त्वज्ञान मांडणारे पुस्तक आहे. पुस्तकातील आशय पाहता आकृतिबंध पाहता या कथा वाटत असल्या तरी अनुभवजन्य आणि व्यक्तिचित्रणात्मक ललित लेख वाटतात. पुस्तकात सात लेखांचा समावेश आहे, पण प्रत्येक लेख आकर्षकरीत्या मांडलेला आहे. आताच्या पिढीलाही आकृष्ट करेल, अशा शब्दांचा समर्पक वापर लेखकाने केलेला आहे. ओघवती आणि प्रवाही निवेदन शैली असल्याने लेखक अगदी सहज आपलं मन व्यक्त करतोय, सुंदर गप्पागोष्टी सुरू आहेत, अशी पुस्तकाची एकूण रचना आहे.
‘झटपट करोडपती कसे व्हावे!’ पुस्तकाचे मुखपृष्ठ संदेश सावंत यांनी रेखाटले आहे. प्रोफेशनल कॉर्पोरेट ट्रेनर अमित भावे यांची प्रस्तावना आहे. यशस्वी आणि समाधानी जीवनाची नेमकी व्याख्या जाणून घेण्यासाठी हे पुस्तक संग्रही असायला हवे.
झटपट करोडपती कसे व्हावे! , लेखक अमोल निरगुडे, प्रकाशक : शारदा प्रकाशन, मूल्य : 101 रुपये