
लोकशाहीत मत हे स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. मात्र त्याच मताधिकारावरून वैयक्तिक वैर काल्याचा गंभीर आरोप संगमेश्वर तालुक्यात समोर आला आहे. निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून गोठणे पुनर्वसन येथील एका तरुणाला कथितरीत्या मारहाण करण्यात आल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम, हातीवचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरुख पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, सुनील शामराव पवार (वय २९, रा. गोठणे पुनर्वसन) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १० तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह जेवणासाठी आर. के. हॉटेल येथे गेले होते. त्यावेळी गावातीलच एका व्यक्तीने निवडणुकीत मदत न केल्याची माहिती संबंधितांना दूरध्वनीवरून दिल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या फिर्यादीत रुपेश कदम, नंदकुमार कदम (दोघेही रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (रा. आंगवली), प्रथमेश धामणस्कर (रा. देवरुख) यांच्यासह चार ते पाच इसमांनी सुनील पवार व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे नमूद आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव करीत आहेत.




























































