बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर लैंगिक शोषणाच्या घटना वाढतच आहेत. वाडा येथे शाळेतील शिक्षकानेच नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले, तर पनवेल येथे शेजाऱ्याने चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले. शिवाय भाईंदर येथे एका हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्टशी लंपट तरुणाने असभ्य वर्तन केले. या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सर्व घटनेतील आरोपींना अटक केली आहे.
भाईंदर – मीरा रोड पूर्व येथील ऑर्चिड रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असलेल्या एका महिलेचा विनयभंग झाला आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश भुल (44) असे आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस निरीक्षक अब्दुल देसाई, उपनिरीक्षक धनंजय गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वाडा – पोशरी येथील आयडियल सीबीएससी स्कूलमधील निवास सूर्यवंशी या शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. मुलीच्या पालकांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता 14 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती उपनिरीक्षक मयूर शेवाळे यांनी दिली.
पनवेल : 40 वर्षीय नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघड झाला. पीडिता आणि आरोपी दोघेही शेजारी राहणारे आहेत. विकृताने मुलीला घराबाहेरील शौचालयात नेऊन अश्लील चाळे केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.