मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी!

विधानसभेत सत्ताधारी बाकांवर मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला. ‘हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान आहे’ अशा घोषणा या वेळी विरोधकांनी दिल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे 293 अन्वये सभागृहात ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी ही बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. सरकारला अधिवेशनाचे गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. “जेव्हा विरोधी पक्षनेते 293चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात थांबायला हवे. इथे फक्त सहकार मंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांसहित विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल तर इथे विरोधी पक्षांनी का बोलायचे? सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले आहेत. याचे सरकारला काहीही गांभीर्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही गांभीर्य नाही,’’ असे धनंजय मुंडे या वेळी म्हणाले. यापाठोपाठ विरोधी बाकांवरून “हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान आहे,’’ अशा घोषणा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिल्या.

त्यावर अजित पवारही सरकारवर तुटून पडले. ‘‘अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकारला गांभीर्य नाही, अक्षरशः भोंगळ कारभार चालू आहे, पहिलं बाकडं तर मोकळंच असतं. त्यावर कुणीही नसतं. आम्हीही सरकार चालवलंय,’’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

“विरोधी पक्षनेते बोलतात तेव्हा सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला हवेत. एवढाही शिष्टाचार लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल तर आम्ही इथे शांत बसतो,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेसचे नाना पटोले यांनी ‘‘राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर विरोधी पक्षाचा प्रस्ताव सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहायला हवे,’’ असा मुद्दा मांडला.

अजित पवार यांनी भातखळकरांना सुनावले
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या वेळी ‘‘महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री अडीच वर्षं सभागृहात कुठे उपस्थित होते?’’ असा सवाल केला. त्याला तातडीने उत्तर देताना अजित पवार यांनी भातखळकरांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले की, ‘‘अतुलजी… नीट आठवा. सभागृहात जेव्हा गरज असायची तेव्हा मुख्यमंत्री असायचेच. पण उपमुख्यमंत्री म्हणून हा अजित पवार सकाळी 9 वाजल्यापासून असायचा. मी तुम्हाला प्रत्येकाला आदर द्यायचो, प्रत्येकाला सकारात्मक उत्तर द्यायचो.’’