
राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यावर आता मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका आणि निवडणूक प्रचाराशी संबंधित बैठका घेण्यास निवडणूक आयोगाने आजपासून बंदी घातली आहे. यापुढे मंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणूक आयोगाचा वॉच असणार आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर राज्याच्या निवडणूक कार्यालयाने आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये आचारसंहितेचे कसे पालन करावे याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय बंगल्यांना जारी होणार आहे. त्यामध्ये शासकीय कामांची आणि निवडणूक मोहीम आणि निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.
राजकीय बैठकांची तक्रार
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मध्यरात्रीनंतर सर्रास राजकीय बैठका होत होत्या. यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पण निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांच्याकडेच या बैठकीचे पुरावे मागितले होते.
वाचाळवीरांना आयोगाचा चाप
निवडणूक प्रचाराच्या काळात अनेकदा उमेदवाराच्या खासगी आयुष्यावर टीकाटिप्पणी केली जाते. प्रचाराच्या काळात अशी टीका केल्यास उमेदवारावर कारवाई होऊ शकते. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्य खासगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये तसेच इतर पक्ष किंवा कार्यकर्त्यांवर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहितीच्या आधारावर टीकाटिप्पणी करू नये अशा सूचना निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आहेत. मंत्र्यांच्या सरकारी वाहनाच्या वापरावरही निर्बंध आणले आहेत. शासकीय वाहन मतदारसंघात नेल्यास कारवाई होऊ शकते.