अटल सेतू अलिबागपर्यंत! मुंबईतून दीड तासात पोहचता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि नवी मुंबईचे अंतर कमी करणारा अटल सेतू आता विमानतळ, जेएनपीटी आणि पुढे अलिबागला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग हे चार ते पाच तासांचे रस्ते मार्गाचे अंतर अवघ्या दीड तासात गाठता येईल. सिडकोने या प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

उलवे भागात सध्या 7 किमी लांबीचा सहा लेन कोस्टल रोड तयार होत आहे. या मार्गाचा पुढील टप्पा म्हणून तो द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पामुळे पुढे थेट कोस्टल कॉरिडॉर तयार होईल. नवी मुंबई विमानतळाला यामुळे थेट आणि जलद जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे विमानतळापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होऊन प्रवासी आणि लॉजिस्टिक अशा दोघांनाही फायदा होणार आहे.

खारफुटीचे संरक्षण

या प्रकल्पात खारफुटीच्या जंगलाचे सर्वेक्षण करण्यासाठी काही भागात एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येणार आहेत. स्टिल्सवर हा रस्ता बांधल्याने पर्यावरणाची हानी टळणार आहे.

असा होणार फायदा

  • या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर प्रमुख मार्गांवरील गर्दी कमी होईल. अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंत ‘सिग्नलमुक्त’ प्रवास होईल, ज्यामुळे प्रवासाची 20 ते 30 मिनिटे वाचतील.
  • रेवस-करंजा पुलाशी जोडणी झाल्यास नवी मुंबई ते अलिबाग आणि पुढे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी फेरीबोटीवरील ताण कमी होऊन पर्यटनाला चालनाही मिळेल.
  • प्रकल्पासाठी 1600 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे, तर विस्तारासाठी 2500 ते 4000 कोटी खर्च अपेक्षित आहे.