लेख – शतायुषी नृत्यसाधना

539

>> दिलीप जोशी

पन्नास वर्षांपूर्वी आमच्या शालेय पुस्तकात एक पानभर रंगीत फोटो होता. नृत्यविशारद उदयशंकर आणि त्यांची पत्नी अमलादेवी यांचा. आमच्या शिक्षकांनी त्या वेळी त्यांच्याबद्दल माहिती दिली. त्या काळात हे दांपत्य हिंदुस्थानी नृत्यकलेतील अनेक रूपांचा आविष्कार परदेशी प्रेक्षकांपुढे सादर करत असत. त्यापैकी उदयशंकर 1977 मध्ये कालवश झाले आणि अमलादेवी वयाची शंभरी पार करून गेल्या महिन्याच्या 24 तारखेला हे जग सोडून गेल्या. काही व्यक्तींना जीवनाचा सूर योग्य वयात गवसतो. ते त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. त्याचं फळ मिळतं ते अपूर्व यशाच्या स्वरूपात. अशा व्यक्ती मग व्यक्ती न राहता संस्था बनतात. अनेकांना मार्गदर्शन करतात. कोलकात्याच्या उदयशंकरांच्या नावे असलेल्या नृत्यकला केंद्रात अमलादेवी वयाची शंभर वर्षे होईपर्यंत कार्यरत होत्या. त्यांची तपस्वी नृत्यसाधना अनेक पिढय़ांना मार्गदर्शन करणारी, घडविणारी ठरली. त्यांची कन्या ममता शंकर आणि मुलगा आनंद शंकर हा वारसा पुढे चालवत आहेत.

आपल्या देशात कलेच्या प्रांतात दोन-तीन पिढ्या नावाजलेली अनेक घराणी आहेत. त्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि पुढच्या पिढीत लतादीदी, आशाताई आणि सर्वच सुरेल भावंडांचा समावेश होतो. गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी हिंदुस्थानी शास्रीय संगीताच्या क्षेत्रात ‘गांधर्व महाविद्यालया’च्या रूपाने हिमालयाएवढं कार्य उभं केलं. त्यांचे चिरंजीव पं. डी. व्ही. पलुस्कर यांनीही त्यांच्या अल्पायुष्यात संगीतक्षेत्रावर अमीट मुद्रा उमटवली. उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे तेवढेच निपुण तबलानवाझ सुपुत्र झाकिर हुसेन, चित्रपट क्षेत्रात शोभना समर्थ आणि पुढच्या पिढीतील नूतन, तनुजा तसंच त्यांच्याही पुढच्या पिढीतील मोहनीश, काजोल ही नावं पडदा गाजवून गेली. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून कपूर घराण्यात सुरू झालेला अभिनयाविष्कार रणबीर, करीना, करिश्मा यांच्या चौथ्या पिढीपर्यंत पोचला आहे.

महाराष्ट्रातील कलासाधनेचा वारसा जपणारी अशी अनेक घराणी आहेत तशी देशात इतरत्रही असतीलच. त्यापैकी बंगालमधील देवेंद्रनाथ ठाकूर आणि त्यांचे नोबेल विजेते सुपुत्र गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) जगाला ठाऊक आहेत. नृत्यसाधक उदयशंकर यांच्यासह त्यांची पत्नी अमलादेवी यांचं योगदान असंच आहे. उदयशंकर यांच्या नृत्यपथात तरुण वयात सहभागी झालेले त्यांचे धाकटे बंधू रविशंकर पुढे जगप्रसिद्ध सतारवादक झाले. रविशंकर यांचे गुरू उस्ताद अल्लाउद्दिन खां यांना तर सात-आठ वाद्यं वाजवता येत असत. ते सरोदवादक म्हणून विख्यात होते. त्यांची कन्या म्हणजेच रविशंकर यांची पत्नी अन्नपूर्णादेवी निष्णात सतारवादक होत्या. अल्लाउद्दिन खां यांचे चिरंजीव अलीअकबर खां यांनीही सरोद, सतारवादनात आपलं स्थान निर्माण केलं.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिला विविध क्षेत्रांत आपलं कर्तृत्व मोकळेपणाने गाजवू लागल्या. आनंदीबाई आणि रखमाबाईंचं डॉक्टर होणं ही एकोणिसाव्या शतकातली गोष्ट. हळूहळू अनेक क्षेत्रांत महिलांचा प्रभाव दिसू लागला. अमलादेवींचा जन्म 27 जून 1919 या दिवशी झाला. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांची पॅरिस येथे उदयशंकर यांच्याशी भेट झाली. त्यानंतर 1939 मध्ये दोघांचा विवाह झाला. उदयशंकर यांनी हिंदुस्थानी नृत्यकलेला ‘युरोपीय थिएट्रिकल डान्स’चा परिचय करून दिला आणि हिंदुस्थानातल्या कथकली, भरतनाटय़म्, कथ्थक, ओडिसी अशा प्रसिद्ध नृत्यशैलींचा परिचय पाश्चात्य जगाला यशस्वीपणे घडविला. त्यांच्या या कार्यात अमलादेवींनी त्यांना भरीव सहकार्य केलं. 1920 ते 30 या काळात या दांपत्याच्या नृत्यकलेने पाश्चात्य जग जिंकलं. तेच कार्य पं. रविशंकर यांनी सतारवादनात केलं.

नृत्याची कोरिओग्राफी करण्याची उदयशंकर यांची विशिष्ट शैली होती. उदयशंकर 1918 मध्ये मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व विद्यालयातही 1918 मध्ये शिक्षणासाठी होते. हे त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं. नृत्यकलेतील अपूर्व योगदानाबद्दल उदयशंकर आणि अमलादेवी दोघांनाही ‘पद्मभूषण’ सन्मान लाभला. अमलादेवींनी उदयशंकर शैलीतील ‘नृत्याचे शॅडो प्ले’ सादर केले. त्यांच्या कार्तिकेय, वासवदत्ता, रासलीला, मानव आणि यंत्र अशा अनेक प्रसिद्ध नृत्यांचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं आणि तो वारसा अनेक शिष्यांपर्यंत पोचवला. त्याचबरोबर त्यांनी शिष्यांना नृत्यवेश आणि त्याचं महत्त्वही शिकवलं. कोरिओग्राफीचे धडे दिले.

असं बहुविध कार्य करत नृत्य हेच आपलं जीवनध्येय मानून त्याचा प्रसार करणार्‍या अमलादेवीना शतायुषी होण्याचं आणि शेवटपर्यंत कार्यरत राहण्याचं भाग्य लाभलं. आपण हाती घेतलेल्या कार्याचं रूप विशाल झालेलं पाहायला मिळणं आणि शतायुषी जीवन लाभणं क्वचितच घडतं. महाराष्ट्रात ते भाग्य महिला शिक्षणकार्यात धोंडो केशव कर्वे यांना लाभलं. तसंच नृत्यक्षेत्रात अमलादेवींनाही लाभलं!

आपली प्रतिक्रिया द्या