एटीएम फोडून 13 लाखांची लूट; शेजारील एटीएममध्येही चोरीचा प्रयत्न

1332

नाशिक जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी 13 लाख 20 हजार 500 रुपयांची रोकड लुटल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेजारील युनियन बँकेच्या एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापल्याचेही निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगर येथील मंजुळा अपार्टमेंटमध्ये स्टेट बँकेचे एटीएम आहे. नागरिक बुधवारी सकाळी येथे पैसे काढण्यासाठी आले असता चोरीची घटना लक्षात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरट्यांनी रोख रक्कमेसोबतच मशीनचे चार कप्पेही पळविल्याचे पोलिसांच्या पाहणीत लक्षात आले. शेजारील युनियन बँकेच्या एटीएममध्येही चोरट्यांनी लुटीचा प्रयत्न केला, तेथील सीसीटीव्ही   कॅमेऱ्याच्या वायर कापलेल्या आढळल्या आहेत.

चोरी झालेल्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजचा डाटा करप्ट झाला असल्याने चोरट्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. मात्र, समोरील दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास एक अनोळखी वाहन एटीएमसमोर उभे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे याच कालावधीत एटीएममधून चोरी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. स्टेट बँकेच्या बहुतांश एटीएम सेंटरबाहेर सुरक्षारक्षक नसल्याने चोरटे याच एटीएमना लक्ष्य करीत आहेत. मागील वर्षी उपनगर येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून अशाच प्रकारची चोरी झाली होती. दरम्यान, आजच्या घटनेप्रकरणी एटीएमचे चॅनल व्यवस्थापक मिलिंद काशीनाथ नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या