एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा – थीम-मेदवेदेवमध्ये फायनल; नदाल, जोकोविचचे आव्हान संपुष्टात

एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत सेमीफायनलमध्ये धक्कादायक निकाल लागले. नंबर वन सीडेड नोवाक जोकोविच व दुसऱया स्थानावरील राफेल नदाल यांचे आव्हान संपुष्टात आले. एटीपी रँकिंगमध्ये तिसऱया स्थानावर असलेल्या डॉमिनिक थीमने नोवाक जोकोविचला आणि चौथ्या स्थानावर असलेल्या डॅनील मेदवेदेवने राफेल नदालला पराभवाचा धक्का देत फायनलमध्ये धडक मारली.

डॉमिनिक थीमने नोवाक जोकोविचचे कडवे आव्हान तीन सेटमध्ये परतवून लावले. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने या लढतीत 7-5, 6-7, 7-6 अशा फरकाने विजय संपादन केला. याचसोबत सलग दुसऱयांदा त्याने एटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मागील वर्षी स्टेफनोस सितसिपास याच्याकडून त्याला अंतिम फेरीत हार सहन करावी लागली होती. यामुळे त्याला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.

पहिल्यांदाच स्पेनच्या दिग्गज खेळाडूला हरवले

24 वर्षीय रशियाच्या डॅनील मेदवेदेव याने शनिवारी रात्री आपल्या कारकीर्दीतील मोठा विजय मिळवला. त्याने स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदालला 3-6, 7-6, 6-3 अशा फरकाने हरवत पहिल्यांदाच एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच त्याने पहिल्यांदाच राफेल नदालला पराभूत केले. याआधी राफेल नदालने तीन वेळा डॅनील मेदवेदेव याला पराभूत केले होते.

दिग्गजांविरुद्ध किमान 5 लढती जिंकणारा दुसराच

डॉमिनिक थीमने नोवाक जोकोविचला हरवत आणखी एक पराक्रम करून दाखवला. नोवाक जोकोविचला त्याने पाचव्यांदा हरवले. रॉजर फेडरर, राफेल नदाल व नोवाक जोकोविच या बिग थ्री अर्थातच महान खेळाडूंना किमान पाच लढतींमध्ये पराभूत करणारा डॉमिनिक थीम हा ग्रेट ब्रिटनच्या अॅण्डी मरे याच्यानंतरचा दुसराच टेनिसपटू ठरलाय हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या