डॅनील मेदवेदेव चॅम्पियन, पहिल्यांदाच जिंकली एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा

रशियाचा 24 वर्षीय टेनिसपटू डॅनील मेदवेदेव याने रविवारी मध्यरात्री ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमचा कडवा संघर्ष तीन सेटमध्ये मोडून काढला आणि पहिल्यांदाच एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. याचसोबत 2009 सालानंतर रशियाच्या टेनिसपटूने ही स्पर्धा जिंकली. याआधी 11 वर्षांआधी निकोलाय डेव्हीडेन्को याने ज्युआन मार्टीन डेल पोट्रोला हरवत एटीपी फायनल्सच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती.

डॅनील मेदवेदेवने जेतेपदाच्या लढतीत डॉमिनिक थीमचे कडवे आव्हान संपुष्टात आणले. अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया डॉमिनिक थीमने पहिला सेट 6-4 अशा फरकाने जिंकत आश्वासक सुरुवात केली, पण यानंतर पुढील दोन सेटमध्ये डॅनील मेदवेदेव याने जबरदस्त खेळ करीत झोकात पुनरागमन केले. त्याने दुसरा सेट 7-6 आणि तिसरा सेट 6-4 अशा फरकाने जिंकत लढतीसह जेतेपदावरही नाव कोरले.

इतिहास रचला

डॅनील मेदवेदेव याने एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत इतिहास रचला. त्याने अव्वल तीन खेळाडूंना पराभूत करीत ही स्पर्धा जिंकली. नोवाक जोकोविच, राफेल नदाल व डॉमिनिक थीमला नमवत त्याने या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. तसेच काही दिवसांपूर्वीच पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकणाऱया डॅनील मेदवेदेव याने सलग दहा सामन्यांमध्ये विजय मिळवलाय हे विशेष!

वेस्ली-निकोला दुहेरीत चॅम्पियन

वेस्ली पुलहोफ व निकोला मेकटीक या जोडीने पहिला मोसम एकत्र खेळताना एटीपी फायनल्स दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. वेस्ली पूलहोफ व निकोला मेकटीक या जोडीने जेतेपदाच्या लढतीत जर्गेन मेल्जर व इडो रॉजर वेसलीन या जोडीवर 6-2, 3-6, 10-5 अशा फरकाने विजय मिळवत झळाळता करंडक पटकावला.

आपली प्रतिक्रिया द्या