एका सहकारी संस्थेत घुसून बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला बेदम मारहाण, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याप्रकरणी मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यासह प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर, विकास कांबळे यांच्यासह अनोळखी तीन ते चारजणांविरोधात अॅट्रॉसिटीसह खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संस्थेचे प्रमुख शुभम कृष्णात देशमुख (वय 25, रा. एकोंडी, ता. कागल; सध्या रा. कळंबा, ता. करवीर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या चौघांना आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी (5 रोजी) रंकाळा परिसरातील श्री साईदर्शन जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी येथील मुख्य शाखेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, समर्थ कशाळकर, प्रसाद पाटील, विकास कांबळे यांच्यासह अनोळखी तीन ते चारजणांनी बँकेच्या केबिनमध्ये जाऊन अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.
जबरस्तीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी देऊन दोघांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याची माहिती असतानासुद्धा सर्वांसमोर जातीवाचक व अवमानकारक वक्तव्य केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. संशयितांनी संस्थेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जबरदस्तीने घेऊन गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.