
पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिळीमकर यांनी आपल्यासा मारहाण केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चेतन आरडे हे 20 जून रोजी पुण्यातल्या शंकरबाबा महाराज मठात माजी नगरसेवक महेश वाबळे यांच्यासोबत दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मठात रुद्राभिषेक सुरू होता. चेतन आरडे जेव्हा पूजेच्या ठिकाणी गेले तेव्हा आरडे आणि शिळीमकर यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. शिळीमकर यांनी आपल्याला मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप चेतन आरडे यांनी केला.
चेतन आरडे यांनी भाजपचे माजी नगरसेवक शिळीमकर यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून शिळीमकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.