मिंधे सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दिवसाढवळ्या सशस्त्र हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे पुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर सशस्त्र हल्ला झाल्याची घटना आज सिव्हिल लाईन भागात घडली. पृथ्वी यांनी स्वतःचा बचाव केल्याने पुढील अनर्थ टळला. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱया नेकलेस मार्गावर पृथ्वी देशमुख मित्रासह एका दुकानात उभे होते.
हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांनी पृथ्वी यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले. तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र यावेळी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गुन्हेगारी वाढली
माझ्या मुलावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. या भागात वारंवार गुन्हेगारी कृत्ये घडत असून ही बाब वारंवार पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस ठाण्यात आलो तर तीनच पोलीस हजर… याकडे लक्ष वेधत पोलिसांनी कारवाई केली नाही तर गुंडांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा नितीन देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.