पोषण आहाराच्या गोडाऊनवर हल्ला; गाडय़ांची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका माजी सुपर वायझरने पाच ते सहा साथीदारांसह शालेय पोषण आहार पुरवणाऱया वितरकाच्या गोडाऊनवर हल्ला केला. वितरकाला खंडणीची मागणी करत गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या 6 गाडय़ांच्या काचा फोडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना 1 फेब्रुवारीला रात्री जुन्या बोल्हेगाव रोडवरील गोडाऊनमध्ये घडली.

याप्रकरणी दत्ता गोरख सोनवणे (रा. अमरधामच्या पाठीमागे, कल्याणरोड) याच्यासह त्यांच्या 5 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सागर मोहन पाटील (वय 32, रा. जय मल्हारनगर, नवनागापूर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पाटील हे शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा प्रतिनिधी असून, त्यांचे जुना बोल्हेगाव रोडवर गोडाऊन आहे. जिह्यातील शाळांना पोषण आहार पुरविण्याचे काम ते करतात. त्यासाठी त्यांच्याकडे 22 वाहने आहेत. पाटील यांच्याकडे यापूर्वी आरोपी दत्ता गोरख सोनवणे हा सुपर वायझर म्हणून कामास होता. सोनवणे हा वाहनचालक व कर्मचाऱयांना दमदाटी करून पैसे मागत असे, त्यामुळे फिर्यादी पाटील यांनी त्यास नोव्हेंबर 2025 मध्ये कामावरून काढले होते.

तेव्हापासून सोनवणे हा पाटील यांच्याकडे 1 लाखाची खंडणी मागत होता. ‘तुला व्यवसाय करायचा असेल तर मला पैसे दे, नाहीतर तुला जीवे मारून टाकील’, अशी धमकी देऊन खंडणी मागत होता. भीतीपोटी पाटील यांनी जानेवारी 2026 मध्ये त्याला 10 हजार रुपये रोख दिले होते. मात्र, त्यानंतरही 1 फेब्रुवारी रोजी रात्री दत्ता सोनवणे याने पाच अनोळखी साथीदारांसह गोडाऊनवर येऊन धुमाकूळ घातला. तेथील कर्मचाऱयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तीन पिकअप, एक मिनी ट्रक आणि दोन टेम्पोची दगडफेक करून तोडफोड केली. याप्रकरणी पाटील यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी दत्ता सोनवणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.