पाकिस्तानात आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला; मूर्तीची विटंबना

678

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. पाकिस्तानात लग्नसोहळ्यातूनच हिंदू मुलीचे अपहरण करून धर्मांतर करून मुस्लीम तरुणाशी तिचा निकाह लावून देण्याची घटना ताजी असतानाच आता एका मंदिरावर हल्ला झाला आहे. सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर हल्ला करून मंदिराचे नुकसान करण्यात आले. तसेच मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर तेथील ग्रंथाचेही नुकसान करण्यात आले. सिंध प्रांतात हिंदू आणि शीख तरुणींचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. त्यातच आता मंदिरावर हल्ला झाल्याने संतापाचे वातावरण आहे.

मंदिरावरील हल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ते सर्व अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या मुलांचे वय 15,13,12 आहे. ‘डॉन’ या वृत्त संस्थेने या बाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याक मंत्र्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात काही जिहादींनी हिंदू मंदिराची तोडफोड करत मुर्तींचीही विटंबना केली आहे. या प्रकारावर दक्षिण आशियाच्या मानवाधिकार आणि दहशतवादावर बेधडक मत मांडणारी पत्रकार नायला इनायत यांनी हा प्रकार ट्विट करुन जगासमोर आणला आहे. ‘सिंध प्रांतात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. एका गटाने थारपारकर येथे माता राणी भटियानी मंदिरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात मूर्तीची विटंबना करून ग्रंथाचे नुकसान करण्यात आले आहे’ अशी माहिती पत्रकार नायला इनायत यांनी ट्विट करून दिली. तसेच त्यांनी घटनास्थळाचे चार फोटोही ट्विट केले आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानात सोशल मीडियावर मंदिर तोडफोडीचा तीव्र निषेध होत आहे. आरोपींना अटक करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानी ‘हिंदू यूथ फोरम’ नामक संघटनेने फेसबुकच्या माध्यमातून मंदिराची तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या