
पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पनवेल तहसील कार्यालय परिसरात आज मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला. आदई पंचायत समिती गणातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार अनिता डांगरकर अर्ज मागे घेण्यासाठी वेळेत पोहोचू नयेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न फसला आणि अनिता डांगरकर यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी पनवेल तहसील कार्याल याबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत भाजपचा निषेध केला.
आदई पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या अनिता डांगरकर आणि शेकापचे विलास फडके यांनी अर्ज भरला होता. आघाडीच्या जागा वाटपात शेकापला हा मतदारसंघ गेला. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी डांगरकर येत होत्या. मात्र भाजपने त्यांना अर्ज मागे घेण्यापासून रोखण्यासाठी आडकाठी आणली. वेळेत पोहोचू नयेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी त्याना पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेकापचे उमेदवार विलास फडके यांनी कार्यकर्त्यांसह तत्परतेने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे डांगरकर दुपारी तीन पूर्वी तहसील कार्यालयात दाखल झाल्या आणि त्यांनी उमेदवारी मागे घेतली.

























































