एमआयएम-काँग्रेसमध्ये राडा, इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला; माजी विरोधी पक्षनेते फिरोज खान जखमी

महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतानाच शहरात काँग्रेस आणि एमआयएममध्ये जोरदार राडा झाला. एमआयएमची पदयात्रा सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील, माजी विरोधी पक्षनेते फिरोज खान हे या हल्ल्यात जखमी झाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे जिन्सी भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.

एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बायजीपुरा, जिन्सी भागात पदयात्रा काढली. पदयात्रा जिन्सी चौकात येताच काँग्रेसचे उमेदवार कलीम पुरेशी यांचे कार्यकर्ते आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटांची घोषणाबाजी सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी पदयात्रेवर अंडी फेकली. यामुळे वातावरण चिघळले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील आणि फिरोज खान यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यात फिरोज खान जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा जिन्सी भागात दाखल झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. या प्रकारामुळे जिन्सी भागात तणाव निर्माण झाला होता.

आमची पदयात्रा शांततेत सुरू असतानाच भाजपने पोसलेल्या माफियांनी आमच्यावर हल्ला केला. या गुंडांना भाजपचे मंत्री अतुल सावे, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे संरक्षण आहे, असा आरोप एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी केला. या प्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पदयात्रा सुरू असतानाच एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही पैसे देऊन एका उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. मात्र या साऱया प्रकाराशी आमचा काही संबंध नाही. शांततेत निघालेल्या पदयात्रेवर अंडी फेकण्यात आली. एमआयएमनेच हल्ल्याची नौटंकी केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार कलीम पुरेशी यांनी केला.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी फेटाळले. तिकीट वाटपात त्यांच्या पक्षात गोंधळ झाला. पैसे घेतल्याचे त्यांचेच लोक बोलत आहेत आणि आरोप आमच्यावर करत आहेत असे सावे म्हणाले.