मालाडमध्ये वाईन शॉपवर दरोड्याचा प्रयत्न फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पूर्व परिसरात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. हारून जैदुल सरदार आणि राज जियालाल दिवाकर अशी त्या दोघांची नावे असून हारूनविरोधात चोरी, दरोडा असे 46 गुन्हे दाखल आहेत. या टोळीने गेल्या काही दिवसांत चारकोप, पवई, जोगेश्वरी, डी. एन. नगर येथे घरफोड्या केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.

गेल्या आठवड्यात मालाडच्या तानाजीनगर येथे रोशनी वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्याने दरोडा टाकून 45 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. दरोड्याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा एका फुटेजमध्ये पोलिसांना एक रिक्षा दिसली. त्या रिक्षाची पोलीस माहिती काढत होते. तपास सुरू असतानाच चार दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक मनोज चाळके, पोलीस निरीक्षक पितळे, गिजे, रावराणे, विक्रम वेदांते यांचे पथक गस्त करत होते. गस्तीदरम्यान वेदांते यांना एक संशयास्पद रिक्षा दिसली. वेदांते यांनी याची माहिती डिटेक्शन स्टाफला दिली.

पोलीस येत असल्याचे पाहून रिक्षात बसलेले चारजण हे अंधाराचा फायदा पळून गेले, तर पळून जात असलेल्या हारूनला वेदांते यांनी पाठलाग करून पकडले. हारूनने वेदांते यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जखमी केले. वेदांते यांनी आरडाओरड केल्यावर अखेर मदतीला आलेल्या डिटेक्शन स्टाफने हारूनला पकडले. हारूनच्या चौकशीत राजचे नाव समोर आले. त्या दोघांनादेखील पोलिसांनी अटक केली. हारून हा मालाडच्या राठोडी गाव येथे राहतो. तो काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर येताच त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्यास सुरुवात केली. हारून हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मुंबईत 46 गुन्हे आहेत. दरोड्याच्या गुन्ह्यात हारून हा मुख्य सूत्रधार असून त्याने वाईन शॉपमध्ये दरोडा टाकण्याचा कट रचला. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरला वाईन शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात दारू ठेवली जाते. त्यामुळेच आठ दिवस अगोदर हारूनने रेकी करून वाईन शॉपमध्ये दरोडा टाकण्याचे ठरवले होते. दरोड्याच्या गुन्ह्यात हारून आणि राजला अटक केली असून त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.