आयपीएल लढतींसाठी क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये एण्ट्री? कमीत कमी प्रेक्षकांना परवानगी देण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षी आयपीएलचा श्रीगणेशा 19 सप्टेंबरपासून होणार आहे. यूएईत होणारी ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेतील लढती प्रेक्षकांविना होणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी पुढे आले होते, पण आता इमिरात क्रिकेट बोर्ड (ईसीबी) स्टेडियममध्ये कमी प्रमाणात क्रिकेटप्रेमींना प्रवेश देण्याचा विचार करीत आहे. यासाठी ते बीसीसीआयसोबत चर्चाही करणार आहेत.

ईसीबीच्या अधिकाऱयाने यावेळी सांगितले की, कोरोनाच्या संकटाचा सर्वांनाच सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य वातावरणात आयपीएलच्या लढती होऊ शकत नाहीत, पण स्टेडियममध्ये कमीतकमी प्रेक्षक असायला हवेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीसीसीआयशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ईसीबीचे जनरल सेक्रेटरी मुब्बशीर उस्मानी यांनी म्हटले की, आयपीएलसारखी मोठी स्पर्धा आमच्या येथे होत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व संस्थांच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधत आहोत. सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

दिल्ली, हैदराबाद पुढल्या आठवडय़ात यूएईत पोहोचणार

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आयपीएल खेळण्यासाठी शुक्रवारी यूएईला रवाना झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबादचा संघ पुढल्या आठवडय़ात यूएईकडे रवाना होण्याची शक्यता आहे.

स्पर्धेदरम्यानही होणार कोरोना चाचणी

आयपीएल स्पर्धेदरम्यानही क्रिकेटपटूंना कोरोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दर पाच दिवसांनंतर क्रिवेटपटू व सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.