चर्चगेट इमारतीचे ऑडिट होणार, त्रिसदस्यीय संस्थेमार्फत अपघाताची चौकशी

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाच्या दर्शनी भागावर सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर ) बसविण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या भव्य प्रतिमेच्या काही वजनी चौकटी ‘वायू’ चक्रीवादळाने कोसळून बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पश्चिम रेल्वेने या संपूर्ण इमारतीचे एका त्रयस्त संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्रिसदस्यीय समितीमार्फत या अपघाताची खातेअंतर्गत चौकशीही करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

चर्चगेट स्थानकाच्या इमारतीवरील 81 फूट उंच महात्मा गांधी यांच्या छायाचित्राच्या पाच चौकोनी ऍल्युमिनियमच्या लाद्या वादळी वाऱयाने दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास कोसळून बुधवारी दुपारी दहिसर येथील रहिवासी मधुकर नार्वेकर (62) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या छातीवर ही ऍल्युमिनियमची लादी थेट कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला असून लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या स्थानकाच्या इमारतीवर ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध ब्राझिलीयन चित्रकार इडयुरो कोब्रा यांनी तयार केलेले महात्मा गांधी रेल्वेतून उतरत असल्याचे 1940 सालचे चित्र बसविण्यात आले होते.

महात्मा गांधीजींचे चित्र राहणार की जाणार?
स्ट्रीट आर्ट इंडिया फाऊंडेशन या एनजीओ आणि एशियन पेण्ट्सच्या सहकार्यातून चर्चगेट इमारतीच्या सुशोभीकरणाचे हे रंगकाम करण्यात आले होते. या इमारतीचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे हे हार्ंडग येथे ठेवायचे की काढायचे याचा निर्णय घेणे सोपे जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱयांची त्रिस्तरीय समिती मार्फत खातेअंतर्गत चौकशीही करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

अनधिकृत जाहिरातींविरुद्ध एमएमआरडीएची तक्रार
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंतर, दिशा आणि स्थान दर्शवणाऱया गॅण्ट्रीवरील अनधिकृत जाहिरातींच्या विरोधात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. खेरवाडी, विलेपार्ले, समता नगर आणि दहिसर पोलीस ठाण्यांमध्ये या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. गेल्या एप्रिल महिन्यातच एमएमआरडीएने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर, सांताक्रुझ, खेरवाडी, विलेपार्ले आणि वाकोला तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील चेंबूर पोस्टल कॉलनी येथील अनधिकृत जाहिराती काढून टाकल्या होत्या. मे. ग्लोबल ऍडव्हर्टायझर्स आणि कॅटलिस्ट ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड मार्केटिंग या दोन कंपन्यांनी या जाहिराती लावल्याबद्दल त्यांना नोटीसही बजावली होती. अजूनही अशा अनधिकृत जाहिराती दिसून येऊ लागल्याने थेट पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय एमएमआरडीएला घ्यावा लागला. वाहतूक मार्गदर्शक फलकांवर या जाहिरातींमुळे वजन पडून अपघात होण्याची शक्यता वाढते. पोलीस कारवाईमुळे अशा कंपन्यांना आळा बसेल असे एमएमआरडीएचे मत आहे.