संभाजीनगर – आतापर्यंत 65 शिक्षक पॉझिटिव्ह, साडे चार हजार जणांच्या चाचण्या

महापालिकेच्या वतीने शहरातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. चार दिवसात एकूण 4575 शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात आतापर्यंत 65 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, यात ग्रामीण भागातील शाळेवर नियुक्ती असलेल्या काही शिक्षकांचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शनिवारी दिली.

कोरोनामुळे राज्यातील शाळा मार्च महिन्यापासून बंद आहेत. मात्र, आता इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सोमवार, 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्याच्या शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. खरबदारी म्हणून संबंधित शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करुन घेण्याची सूचना शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नववी ते बारावी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. शुक्रवारी ८ शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शनिवारीही दिवसभरात सुमारे तेराशे शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले होते. याविषयी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, प्रामुख्याने शहरातील शिक्षकांच्या चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागातील बरेचसे शिक्षक शहरात वास्तव्यास असल्याने त्यांनीही मनपाच्या केंद्रांवर चाचण्या केल्या. चार दिवसात एकूण ४५७५ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यांना उपचारासाठी कोवीड केअर सेंटरमध्ये भरती करुन घेण्यात आले आहे, असे पाडळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या