पाकीटमारीच्या हिश्श्यावरून हौदात बुडवून केला खून,  गुन्हे शाखेने उघड केला गुन्हा

51
murder

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मनावर घेतले आणि कोणताही सुगावा लागलेला नसताना खुनाचा गुन्हा उघड करून आरोपीला परतूर येथून अटक केली. पाकीटमारीच्या हिश्श्यावरून वाद झाल्याने परभणी येथील पांडुरंग रामा पवार या तरुणाला हौदात बुडवून खून केल्याची कबुली रमेश उर्फ रम्या दशरथ जाधव या आरोपीने दिली. मुकुंदवाडीत पंधरा दिवसांपूर्वी राजनगरातील पत्र्याच्या शेडमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला होता.

मुकुंदवाडी, राजनगरातील यादव यांच्या पत्र्याच्या शेडमधून दुर्गंधी येत असल्याने ३१ ऑगस्ट रोजी मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल केला होता. मृतदेह कुजल्याने तो स्त्री जातीचा आहे की पुरुषाचा हेही कळत नव्हते. डॉक्टरांनी मृतदेह पुरुष जातीचा असून, त्याचे वय ३५ ते ४० वर्षे असल्याचा अहवाल दिला होता. तसेच दोन महिन्यांपूर्वी हा खून करण्यात आल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला होता. तसेच ओळख पटू नये म्हणून मारेकर्‍यांनी कपडे व इतर वस्तूंची विल्हेवाटही लावली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

अन् पोलिसांनी मनावर घेतले…

मृतदेह सापडल्यानंतर उपायुक्त निकेश खाटमोडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांना शंका आली. शेडमालक यादव यांना बोलावले असता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या किल्लीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला असता दुसरे कुलूप लावलेले असल्याचे दिसले. यावरून कोणीतरी तरुणाचा खून करून दुसरे कुलूप लावल्याचे दिसले. यावरून तरुणाचा खून झाल्याच्या दिशेने तपासाला सुरुवात करण्यात आली. शेडजवळ येणार्‍या जाणार्‍यांची माहिती घेतली असता एक महिला व त्याच्यासोबत पुरुष येत असल्याचे समजले. यावरून दोघांच्या वर्णनावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नांदेड, परभणी येथील रेल्वेस्थानकावर जोडप्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या वर्णनाचे जोडपे हे परतूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने परतूर येथून रमेश उर्फ रम्या दशरथ जाधव यास ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने मृत पांडुरंग रामा पवारसह रेल्वेत पाकीटमारी करत असल्याची कबुली दिली. पाकीटमारीत पैशाच्या हिश्श्यावारून दोघांत वाद झाला. यावरून आरोपी रम्या जाधव याने मयतास घरासमोरील हौदात बुडवून बेदम मारहाण केली. यात तो मृत झाल्याचे लक्षात येताच त्याने घरासमोरील यादव यांच्या शेडचे कुलूप तोडून मृतदेह कोंडून दुसरी कुलूप लाऊन पळ काढल्याची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या