संभाजीनगर शहरात 14 एप्रिलपर्यंत वाहनबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलेले असले तरी या संचारबंदीच्या काळातही लोक सर्रासपणे वाहने चालवत ये जा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण होऊ शकते हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संभाजीनगर शहरात सर्वच प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली आहे.

14 एप्रिलपर्यंत ही बंदी असेल. शासनाने परवानगी दिलेल्या वाहनांशिवाय कोणतीही वाहने रस्त्यावर आल्यास वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. फौजदारी दंड प्रक्रीया संहितेनुसार ही कारवाई केली जाणार आहे. सायकल, दुचाकी, तीनचाकी, चार चाकी, हलकी व जड वाहने यांचा या बंदीत समावेश आहे.

या वाहनांना वगळले
मात्र या बंदीतून पोलीस व आरोग्य विभागाची वाहने, आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबधीत वाहने, रूग्णवाहिका (ज्यात केवळ एक चालक व दोनच प्रवासी असतील), डॉक्टर्स आणि पॅरामेडीकल स्टाफ, अत्यावश्यक सेवा, जीवनाश्यक सेवा, वस्तु व माल यांची वाहतूक, प्रसारमाध्यम व त्यांचे प्रतिनिधी यांच्या वाहनांना व जिल्हाधिकारी किंवावा पोलीस आयुक्त यांची ज्यांनी परवानगी घेतलेली आहे त्यांच्या वाहनांना यातून वगळण्यात आलेले आहे.