संभाजीनगरातील आणखी तिघे कोरोनाच्या विळख्यात, रुग्णांचा आकडा 14 वर पोहोचला

720

संभाजीनगर शहरात कोरोनाचे पाय पसरणे सुरू केले असून आज आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 58 वर्षीय व्यक्तीच्या घरातील मोठ्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण झाली आहे. तर जलाल कॉलनी येथील एका 17 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक तथाह नोडल ऑफिसर डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

शहरातील सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असल्यामुळे संभाजीनगर शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सोमवारपर्यंत 11 वर पोहोचलेला हा आकडा मंगळवारी दुपारपर्यंत 14 वर पोहोचला आहे.

रविवारी म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मराठवाड्यात कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला होता. तो संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील सह्याद्रीनगरात राहत असे. त्यांच्या कुटुंबियातील 8 जणांची प्रशासनाकडून तातडीने तपासणी करून स्राव घेण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये मृताचा मोठा मुलाला आणि लहान मुलाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. मात्र या घरातील मृत बँक व्यवस्थापकाच्या कुटुंबातील आई, भाऊ आणि मावशी मात्र निगेटिव्ह आल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, जलाल कॉलनी येथील एका 17 वर्षीय तरुणीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. या सर्व जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सर्वांवर एआरटी ट्रीटमेंट सुरू केली जात आहे, असे डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घाटी रुग्णालयात काल सोमवारी ब्रदर पॉझिटिव्ह आढळल्याने जवळपास 115 डॉक्टर्स आणि 30 परिचरिकाना स्क्रिनिंग करण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप यायचा असून या परिचरिकाना होम क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे त्या सर्वजणी आज कामावर आल्या नसल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

संभाजीनगरात हाय अलर्ट
संभाजीनगर नगर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अत्यंत घातक असून आतातरी परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

संभाजीनगर शहरात आज मंगळवारी आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पुण्यापाठोपाठ आता संभाजीनगरमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात ठेवायची असेल तर नागरिकांनी काही झाले तरी घराबाहेर पडू नये हाच एकमेव उपाय आहे, असे घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या