संभाजीनगरचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे निधन

68

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, टॅक्सीचालक मालक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय (७०) यांचे मंगळवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

गुरुगोविंदसिंगपूरा या परिसरात राहणारे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी संभाजीनगर महानगर पालिका अस्तित्वात आल्यानंतर दुसरे उपमहापौरपद  ५ जूलै १९८९ ते ९ मे १९९० पर्यंत भूषविले होते. त्यानंतर त्यांनी शहराचे चौथे महापौर म्हणून १३ मे १९९१ ते २८ मे १९९२ पर्यंत काम पाहिले. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापन केली. त्यावेळी माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले शहराध्यक्षपद भूषवले.

राजकारणात असले तरी ते आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अजातशत्रुच होते. गरीबांसाठी सतत पुढाकार घेऊन ते कामे करीत. गेल्या काही वर्षापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद भूषवित  होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार चालू असतानाच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली जवाई, सुन नातवंडं असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या