संभाजीनगर – मेल्ट्रॉनमधील सिटीस्कॅन मशीन सुरू, एक्सरेसाठी आणल्या फिल्म

मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये बजाज उद्योग समुहाच्या सहकार्याने बसविण्यात आलेले सिटीस्कॅन मशीन परवानगीच्या अधिन राहून आज गुरुवारपासून सुरु करण्यात आले आहे. त्यासोबतच एक्सरे मशीनसाठी फिल्म आणण्यात आल्या असून एक्सरे काढले जात असल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या इतर आजाराची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन बसवण्यात आले. या सिटीस्कॅन मशीनचे दिवाळीपूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. परंतु एमआरसीची परवानगी नसल्यामुळे हे सिटीस्कॅन मशीन सुरु करण्यात आले नव्हते. या संदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाने एमआरसीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांच्याकडून परवानगी पाठवत असल्याचा मेल प्राप्त झाला. हा मेल प्राप्त झाल्यामुळे गुरुवारपासून मेल्ट्रॉनच्या कोविड सेंटर मधील कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची सिटीस्कॅनव्दारे तपासणी सुरु केली. याकरिता लागणारे रेडीओलॉजिस्ट, डॉक्टर, इतर स्टाफ देण्यात आला असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. तसेच फिल्म नसल्यामुळे एक्सरे काढण्याचे काम बंद होते. तातडीने एक्सरेसाठी फिल्म आणण्यात आले असून कोरोना रुग्णांचे एक्सरे काढण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या