संभाजीनगरात सारीचा धोका वाढला, आणखी एक रुग्ण आढळला; तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना व्हायरस सोबतच शहरात सारी (सिव्हिअरली ॲक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नवीन आजाराचादेखील प्रादुर्भाव झाला आहे. सारीमुळे मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तसेच इतर चार रुग्णही आढळून आले होते. त्यानंतर बुधवारी सारीचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असलेतरी आणखी एक रुग्ण आढळून आल्याने सारीचा धोका वाढतच चालला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.

कोरोना व्हायरसने संभाजीनगर शहरात शिरकाव केल्याचे दोन आठवड्यापूर्वी निष्पन्न झाले. तेव्हापासून महापालिकेची यंत्रणा या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय हे या उपाययोजनांवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. शहरात येणाऱ्या विदेशी नागरिकांसह, इतर शहरातून आलेल्या प्रवाशांची महापालिकास्तरावर तपासणी केली जात आहे. मात्र,  एकीकडे कोरोना रोखण्यासाठी तयारी सुरू असताना आता सारी या आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत.

मंगळवारीच सारी मुळे शहरात एकाचा मृत्यू झाला. तसेच इतर चार रुग्णही आढळून आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी सारीचे आणखी दोन रुग्ण आढळून आले. आता शहरातील सारीच्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. या सर्व रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यापैकी निधन.झालेल्या एकासह दोघांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. तिघांचा अहवाल अद्याप आलेला नाही. तसेच सारीचा धोका वाढतच असून आज गुरुवार, 26 रोजी आणखी एक रुग्ण सारीचा आढळून आला असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या