संभाजीनगरमधील ऊस उत्पादकांना 204 कोटींचे वाटप

583

उसाचे गाळप केल्यानंतर खासगी आणि सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा दिवसांनंतर गाळप केलेल्या उसाची रक्कम रास्त व किफातशीर किंमती (एफआरपी) नुसार अदा करणे बंधनकारक असून, संभाजीनगर विभागातील 18 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 204 कोटी रुपयांचे वाटप केले आहे, 185 कोटी रुपये वाटप करणे बाकी आहे.

मराठवाडा विभागातील संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत 18 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामात सहभाग घेतला आहे. यामध्ये खासगी 9 आणि सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या 9 साखर कारखान्यांचा समावेश आहे. साखर कारखाना हंगाम सुरू होऊन आज जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या दरम्यान विभागातील साखर कारखान्यांनी 17 लाख 92 हजार 449 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 16 लाख 16 हजार 168 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागात गाळप केलेल्या साखर कारखान्यांना साखर उतारा हा सरासरी 9.02 टक्के प्राप्त झाला आहे.

शेतकऱ्याच्या उसाचे गाळप केल्यानंतर ऊस उत्पादकांना गाळप केलेल्या उसाचे साखर कारखान्यांनी रास्त व किफातशीर किमती (एफआरपी) नुसार पंधरा दिवसांनंतर रक्कम अदा करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. काही साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार रक्कम वाटपाचा कायदा पाळला आहे, तर काहीनी याकडे दुर्लक्ष केले आहे. विभागात आतापर्यंत गाळप झालेल्या उसाची रक्कम ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वजा करून एफआरपीनुसार अदा केली जाते, विभागातील शेतकऱ्यांना एफआरपीनुसार 390 कोटी 27 लाख 77 हजार रुपये ऊस मिळणे अपेक्षित आहे, मात्र आतापर्यंत यापैकी 204 कोटी 76 लाख 65 हजार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अदा केले आहेत. उर्वरित रक्कम 185 कोटी 51 लाख 12 हजारांची रक्कम साखर कारखान्यांकडे थकीत आहे. ही थकीत रक्कम निर्धारित कालावधीत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या