शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये द्या, उद्धव ठाकरे यांची जोरदार मागणी

547
uddhav-thackeray
फाईल फोटो

कागदपत्रे, निकषाच्या लालफिती तत्काळ बाजूला करा आणि परतीच्या पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या, अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. शेतकरी अडचणीत असताना बँकांना कर्जवसुलीच्या उचक्या लागल्या आहेत. या नोटिसा तत्काळ थांबवा, नसता गाठ शिवसेनेशी आहे असा खणखणीत इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलो आहे, असा दिलासाही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना दिला.

परतीच्या पावसामुळे मराठवाडय़ात शेतशिवाराचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज संभाजीनगर येथे आले होते. पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परतीच्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला आहे. हवालदिल झाला आहे. या क्षणाला त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे निकष, कागदपत्रे वगैरे भानगडीत न पडता थेट शेतकऱयाच्या हाती हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. सरकारने केलेली 10 हजार कोटी रुपयांची तजवीज अतिशय तुटपुंजी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार संजय जाधव, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार संदीपान भूमरे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, प्रा. रमेश बोरनारे, संजय शिरसाट, ज्ञानराज चौगुले, डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख मनीषा कायंदे, जि.प.च्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदींची उपस्थिती होती.

ओला दुष्काळ ही आपत्तीच आहे

ओला दुष्काळ प्रशासकीय निकषात बसतो की नाही हे माहित नाही, पण ही आपत्तीच आहे. संपूर्ण राज्यावर हे संकट आले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱयाच्या आयुष्याचाच चिखल केला आहे. शेतकऱयाला या आपत्तीतून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकऱयांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपये देऊ केलेत पण ही तरतूद अतिशय अपुरी आहे. केंद्र सरकारनेही यात आपला मदतीचा वाटा उचलला पाहिजे. नव्हे, ही त्यांची जबाबदारी आहे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

बँका, विमा कंपन्यांना नम्र विनंती…

शेतकरी अडचणीत असताना बँकांना कर्जवसुलीचे सुचले आहे. शेतकऱयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. बँका, पीक विमा कंपन्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, आमच्या शेतकऱयाला नाडू नका. नसता गाठ शिवसेनेशी आहे. कसल्या नोटिसा बजावताय? हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. या नोटिसांची होळी करू. यापुढे एकाही शेतकऱयाला नोटीस आल्यास शिवसेना आपल्या भाषेत उत्तर देईल, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

महाराष्ट्रभर दौरा करणार

परतीच्या पावसाचे संकट संपूर्ण राज्यावर आहे. मराठवाडय़ाला त्याची झळ जास्त बसली आहे. त्यामुळे मी येथे अगोदर आलो. आता शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोणता करार करताय, देशाला सांगा हिंदुस्थान उद्या ‘आरसीएपी’ करारावर स्वाक्षऱया करणार आहे. हा करार काय आहे, देशाच्या हिताचा आहे का, कोणत्या अटी-शर्ती यात आहेत हे देशाला कळले पाहिजे अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

शेतकऱ्यांना मदत करा – शिवसैनिकांना आदेश

परतीच्या पावसामुळे राज्यभरातील शेतकरी अडचणीत आला आहे, सैरभैर झाला आहे. त्याला मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी शिवारात, घरी जाऊन शेतकऱयांशी संवाद साधावा, त्याला मदतीचा हात द्यावा असे आदेशच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

खचू नका, धीर सोडू नका! शिवसेना तुमच्या पाठीशी!!

अगोदर कोरडा दुष्काळ होता. आता ओला दुष्काळ आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण खचू नका, धीर सोडू नका. आत्महत्या करण्याचा विचार तर मनात आणूही नका. कुटुंबातील एखादा सदस्य अडचणीत असताना त्याच्या मदतीला धावून जाणे हे आमचे कर्तव्यच नाही तर ती जबाबदारी आहे. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा शब्दच उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना दिला. गेल्या दोन महिन्यांपासून परतीच्या पावसाने मराठवाडय़ासह राज्यभरात धुमशान घातले आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस, मका, बाजरीची या पावसाने वाताहत झाली आहे.

शिवसेना सत्तेत असेल की नाही, लवकरच कळेल!

शेतकऱयांना तत्काळ मदत करावी हे खरे आहे पण त्यासाठी अगोदर सरकार यावे लागेल आणि ते शिवसेनेचे असेल की आणखी कुणाचे असेल, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत असेल की नाही हे लवकरच कळेल असे सूचक उत्तर दिले. शेतकरी अडचणीत आहे. त्याच्या जगण्यामरण्याचा प्रश्न आहे. परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेस सत्तास्थापनेचे स्वप्न पाहणे माझ्या मनाला पटत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मी पुन्हा येईन…’ची शेतकऱयांना धास्ती

शेतकरी नको नको म्हणत असतानाही परतीच्या पावसाचे आपले ‘ मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ असे चालले आहे. ‘मी पुन्हा येईन…’ची आता शेतकऱयांना भीती वाटत असल्याचा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या