संभाजीनगरात दीडशे ठिकाणी भरणार भाजीमार्केट, गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्तांचा निर्णय

कोराना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात वारंवार आवाहन करूनही जाधववाडी नव्या मोंढ्यांतील भाजीमंडीत भाजीपाला खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केल्यानंतर तेथेही गर्दी होत असल्याने आता महापालिका आयुक्‍तांनी जाधववाडी मंडीतील गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी शहरातील प्रमुख सहा ठिकाणांसह 150 खुल्या जागांवर भाजीपाला विक्रीची दुकाने हलविण्याचा निर्णण घेतला आहे.

मागील तीनच दिवसांत कोरोनाचे 14 रूग्ण शहराच्या विविध परिसरांत आढळले. त्यातच मराठवाड्यातील कोरोनाचा पहिला बळी शहरात गेला. त्यामुळे पुन्हा शहराची चिंता वाढली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही जाधवाडी नवा मोंढा येथील भाजीमंडीत होलसेल व किरकोळ विक्रेते, सोबतच नागरिकही भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करत आहे. ही स्थिती पाहून पालिका, पोलीस प्रशासन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने ही गर्दी कमी करण्यासाठी किरकोळ विक्रेते व ग्राहकांना आंबेडकरनगर परिसरात जवळगाव रोडवरील सर्विस रोड उपलब्ध करून दिला. मात्र येथेही गर्दी होत असल्याने पुन्हा प्रशासनाने येथील भाजीमंडी हलविली. या पार्श्‍वभूमीवरच महापालिका आयुक्‍त अस्तिककुमार पाण्डेय यांनी फेसबूक व ट्विटरवर पत्रकार तसेच शहरवासीशी संवाद साधला. यावेळी आयुक्‍तांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करताना शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी भाजीमार्केट सुरू करत असल्याचे सांगितले. जाधववाडीतील वाढती गर्दी रोखण्यासाठी हा पर्याय निवडला असून शहरातील प्रमुख सहा ठिकाणांसह 150 खुल्या जागांवर भाजीमार्केटमधील दुकाने हलविली जाणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

आमखास मैदान, छावणी मैदान, हर्सूल जेलसमोरील मैदान, चिकलठाणा एमआयडीसी जळगाव मार्गावरील सर्विस रोड, बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्स मैदान, शहानुरमिया दर्गा आठवडी बाजार या सहा प्रमुख ठिकाणांसह जाधवाडी आणि शहरातील १५० खुल्या जागांवर भाजीपाला दुकाने हलविणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

चार दिवसांची भाजी एकदाच घ्या

लॉकडाऊन काळात घरात राहूनच आपण कोरोनाचा लढा जिंकू शकतो. 95 टक्के लोक याचे पालन करत आहेत. मात्र 5 टक्के लोक वारंवार आवाहन करूनही रोज ताजी भाजी खरेदी करण्यासाठी वा इतर कारणांसाठी घराबाहेर पडून स्वतःबरोबर इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करत आहेत. अशांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आयुक्‍त पाण्डेय यांनी रोज भाजीपाला खरेदी न करताना एकदाच चार दिवसांचा भाजीपाला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

या ठिकाणी भरणार भाजीमार्केट

– आमखास मैदान :250 दुकाने
– छावणी मैदान : 200 दुकाने
– हर्सूल जेलसमोरील खुले मैदान : 150 दुकाने
– सिडको स्थानक जळगाव सर्विस रोड : 500 दुकाने
– बीड बायपास जबिंदा लॉन्स : 200 दुकाने
– जाधववाडी मंडी रोड : 300 दुकाने
– मनपाच्या 150 खुल्या जागा : 1 हजार दुकाने

आपली प्रतिक्रिया द्या