
सामना ऑनलाईन, श्रीनगर
राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांचा एक व्हिडीओ दहशतवाद्यांनी प्रसारीत केला आहे. गुस्सू भागातील जंगलात नेऊन औरंगजेब यांची हालहाल करून हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी त्यांना मारहाण करून एका झाडाखाली बसवण्यात आलं आणि या दहशतवाद्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. दहशतवादी औरंगजेब यांच्याकडून ते कोणाला रिपोर्ट करायचे हे काढून घेण्याचा प्रयत्न करीत होते.
वसीम शहा या दहशतवाद्याच्या एन्काऊंटरध्ये औरंगजेब यांनी भाग घेतला होता. औरंगजेब यांचं अपहरण हे याच एन्काऊन्टरचा बदला घेण्यासाठी करण्यात आलं आहे. औरंगजेब हे ४४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. या तुकडीने समीर टायगर आणि सद्दाम या कुख्यात दहशतवाद्यांचा देखील खात्मा केला होता. १४ जून रोजी औरंगजेब यांचं अपहरण करण्यात आलं होतं. १५ जूनच्या रात्री त्यांचा मृतदेह जवानांना सापडला होता.

























































