#AUSvPAK ऑस्ट्रेलियाकडून ‘व्हाईट वॉश’, पाकिस्तानचा लाजिरवाणा विक्रम

डेव्हीड वॉर्नरचे नाबाद त्रिशतक, मार्नस लाबुशेनचे शतक, त्यानंतर पहिल्या डावात मिशेल स्टार्कचा बळींचा ‘षटकार’ आणि दुसऱ्या डावातील नाथन लायनचा बळींचा ‘पंच’ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटीत 1 डाव आणि 48 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पाहुण्या पाकिस्तानला ‘व्हाईटवॉश’ दिला. पहिल्या कसोटीत देखील ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 1 डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला होता.

अॅडलेड येथे खेळलेल्या गेलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने आपला दुसरा डाव 3 बाद 39 धावांवरून पुढे सुरू केला. शाह महमूद (68) आणि असद शफिक (57) या दोघांमध्ये शतकीय भागिदारी झाली. पाकिस्तानने शंभरी पार केल्यानंतर दोन्ही खेळाडू बाद झाले. दोघांनीही अर्धशतकीय खेळी केली. यानंतर मोहम्मद रिझवान (45) वगळता अन्य खेळाडू मैदानावर टिकू शकले नाहीत. पाकिस्तानचा संपूर्ण डाव 239 धावांमध्ये आवरला आणि ऑस्ट्रेलियाने डावाने विजय मिळवला. पहिल्या डावात त्रिशतक ठोकणाऱ्या वॉर्नरला सामनावीरचा किताब देण्यात आला.

पाकिस्तानचा लाजिरवाणा विक्रम
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियातील मालिका गमावताच त्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम जमा झाला. ऑस्ट्रेलियामध्ये सलग 13 कसोटी सामने गमावण्याचा नकोसा विक्रम पाकिस्तानच्या नावावर जमा झाला. विशेष म्हणजे 1995 नंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

धावफलक –
ऑस्ट्रेलिया, पहिला डाव – 3 बाद 589 वर घोषित
पाकिसतान – पहिला डाव 302 आणि दुसरा डाव 239

आपली प्रतिक्रिया द्या