ऑस्ट्रेलियन बोर्डाचा पाकिस्तानला ठेंगा; नियमित दौऱयापेक्षा आयपीएलला पसंती

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आगामी महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या वन डे व टी-20 संघांची घोषणा झाली. मात्र डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड अशा दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तान दौऱयातून माघार घेतली आहे. मार्चअखेरपर्यंत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पाकिस्तान दौऱयापेक्षा आयपीएलला पसंती दिली आहे.

पाकिस्तान दौऱयावर ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 29 मार्चपासून वन डे मालिका सुरू होणार असून एकमेव टी-20 लढत 5 एप्रिलला होणार आहे. विस्फोटक फलंदाज मॅथ्यू वेड व वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क यांनीही पाकिस्तान दौऱयातून माघार घेतली आहे. ऍरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात जोश इंग्लिस, बेन मॅकडरमॉट, नाथन एलिस यांना स्थान देण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्थाही मोठे कारण

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा संपेपर्यंत एकाही क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही, असा नियम क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंनी आयपीएलला पसंती देताना पाकिस्तान दौऱयावर जाणे टाळले. शिवाय पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवरही परदेशी खेळाडूंचा फारसा विश्वास नाही. त्यामुळे पाकिस्तान दौऱयासाठी परदेशी खेळाडू नेहमीच उत्साही नसतात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार 5 एप्रिलपर्यंत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही, मात्र त्यापूर्वी ते हिंदुस्थानात जाऊ शकतात. 6 एप्रिलपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएलसाठी उपलब्ध असतील. पाकिस्तान दौऱयानंतर 6 एप्रिलला हिंदुस्थानात आल्यानंतर क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूंनी पाकिस्तान दौरा टाळला.

24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानला जाणार

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ 1998 नंतर म्हणजेच 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱयावर जाणार आहे. त्यावेळी मार्क टेलरच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 फरकाने जिंकली होती.

ऑस्ट्रेलिया वन डे, टी-20 संघ

ऍरोन फिंच (कर्णधार), सीन एबट, एस्टन एगर, जेसन बेहरन्डोर्फ, एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, ट्रेकिस हेड, जोस इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, बेन मॅकडरमॉट, केन रिचर्ड्सन, स्टीक स्मिथ, मार्क्स स्टॉयनिश, ऍडम झम्पा.