बांगलादेशला क्रिकेट नव्हे, मदतीची गरज; ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली गहिवरली

ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे; पण सध्या निर्माण झालेल्या भीषण जनसंघर्षामुळे तिथे क्रिकेट खेळणे योग्य नसेल. संकटात असलेल्या बांगलादेशला सध्या क्रिकेटची नव्हे, तर अन्य गोष्टींच्या मदतीची अधिक गरज असल्याची भावना ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने व्यक्त केल्या.

बांगलादेशमध्ये सुरू असलेली हिंसा देशव्यापी होती. ती आता थांबली असली तरी तणाव कायम आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे आणि त्या हिंदुस्थानात आश्रयासाठी गेल्या आहेत. त्यामुळे नोबल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्याकडे देशाचे हंगामी नेतृत्व सोपवण्यात आले आहे. येत्या 3 ते 19 ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशात महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे आणि यात जगज्जेत्या ऑस्ट्रेलियासह दहा संघ भिडतील.

बांगलादेशची वर्तमान स्थिती पाहून एलिसा हिली अक्षरशः गहिवरली. तिथे खेळणे मला कठीण वाटतेय आणि एक व्यक्ती म्हणून तिथे खेळण्याचा विचार करणेच चुकीचे आहे. या हिंसेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदतीची गरज आहे. बांगलादेशमध्ये स्पर्धा आयोजन कठीण आहे, पण याबाबत विचार करण्यासाठी आयसीसी आहे. ते याबाबत योग्य निर्णय घेतीलच.

बांगलादेशला याक्षणी क्रिकेटची नव्हे, तर मदतीची गरज आहे. त्यांना जे जे हवेय ते पुरविले जावे; परंतु स्पर्धा आयोजनाचा निर्णय मी आयसीसीवरच सोडते. ते या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशात सहा सामने आणि तीन वनडे आणि 3 टी-20 सामने खेळला होता.

2014 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच बांगलादेश दौरा होता आणि ही मालिका टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी महत्त्वाची मानली गेली होती. बांगलादेशमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा दुसऱ्या देशात आयोजित केली जाईल, यामुळे ऑस्ट्रेलियाची मेहनत वाया जाणार नाही. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशात खेळलेले सहाच्या सहा सामने जिंकले होते.