जगात बुमराच लय भारी, रिकी पॉण्टिंगने उधळली स्तुतिसुमने

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्व फॉरमॅटमध्ये अफलातून खेळ करतोय. त्यामुळे जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याचे क्रिकेट विश्वावर राज्य केले आहे, अशी स्तुतिसुमने उधळली आहेत ऑस्ट्रेलियन महान कर्णधार रिकी पॉण्टिंगने.

पॉण्टिंग आज बुमराबद्दल भरभरून बोलला. त्याच्या श्रेष्ठत्वाचे कौतुक केले तसेच त्याच्या दीर्घकाळ खेळण्याबद्दलही चिंता व्यक्त केली. नेहमीच दुखापतीने त्याला ग्रासले आहे, पण तो दुखापतीतून बरा होऊन पुन्हा सुस्साट सुटला आहे. त्याच्या दुखापतीची सर्वांनाच काळजी असते. तसे असले तरी तो गेल्या पाच-सहा वर्षांतील जागतिक क्रिकेटमधला सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. काही वर्षांपूर्वी दुखापती झाल्या तर भीती वाटायची, तो पहिल्यासारखा पुन्हा गोलंदाजी करू शकेल ना. पण त्याने वेळोवेळी जबरदस्त पुनरागमन करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पॉण्टिंग पुढे म्हणाला, बुमरासारख्या खेळाडूंबद्दल योग्य माहिती हवी असेल तर त्याच्या सहकारी खेळाडूंना विचारायचे आणि जेव्हा तुम्ही विरोधी फलंदाजांना त्याच्याबद्दल विचाराल तर ते नेहमीच एकच उत्तर देतात. ते एक दुःस्वप्न आहे. पुढे नेमके काय घडणार आहे, हे तुम्ही कधीही ओळखू शकत नाही. तो असा गोलंदाज आहे, तो इनस्विंगही करू शकतो, आऊटस्विंगही करू शकतो.

तो कोणताही चेंडू स्विंग करू शकतो. त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या स्विंगची कमाल दाखवलीय. तो या वर्ल्ड कपमध्येही त्याच जोशात होता. तीच अचूकता होती. त्याच्या खेळात कोणताही बदल झाला नव्हता. तो इतका जबरदस्त आहे की, त्याच्या कामगिरीत, प्रदर्शनात वाढच होतेय. तो सोन्यासारखा चकाकतोय. त्याच्या जे कौशल्य आणि सातत्य आहे, तो एक महान गोलंदाज बनण्याच्या मार्गावर धावतोय. मी मॅकग्राला पाहिलेय, मी अॅण्डरसनला पाहिलेय. ते कामगिरीच्या सातत्यामुळेच यशाच्या शिखरावर कायम राहिलेत. आता यात बुमराचेही नाव जोडले गेले असल्याचे पॉण्टिंग म्हणाला.