ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा – सबालेंका, अल्काराजची उपांत्यपूर्व फेरीत धडक

अव्वल मानांकित एरिना सबालेन्का हिने रविवारी १७व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या व्हिक्टोरिया एमबोकोचा ६-१, ७-६ (१) असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याचबरोबर जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजनेही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत गेल्या चार वर्षांत तिसरा किताब जिंकण्याच्या तयारीत असलेल्या बेलारूसच्या एरिना सबालेन्काने आपल्या जबरदस्त सर्व्हिसचा प्रभाव दाखवत फक्त ३१ मिनिटांत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्का तितकी प्रभावी राहिली नाही आणि तिने काही अनावश्यक चुका केल्या. एमबोकोने या सेटमध्ये चांगला प्रतिकार केला. सबालेन्काने ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, ५-४ वरून तीन मॅच पॉइंट गमावले. एमबोकोने आपली लय परत मिळवत सामना टायब्रेकपर्यंत नेला, पण शेवटी सबालेन्काने वर्चस्व राखले. हा तिचा सलग २०वा टायब्रेक विजय ठरला. सबालेन्काने २०२३ आणि २०२४ मध्ये हा ग्रँडस्लॅम जिंकला होता. तसेच गेल्या वर्षी मॅडिसन कीजविरुद्ध ती उपविजेती ठरली होती. बेलारूसच्या या खेळाडूने दोन वेळा यूएस ओपनचे विजेतेपदही मिळवले आहे.

दरम्यान, पुरुष एकेरीत जगातील अव्वल खेळाडू कार्लोस अल्काराजदेखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्काराजने अमेरिकेच्या टॉमी पॉ लचा ७-६ (६), ६-४, ७-५ असा पराभव केला. अल्काराजने अद्याप ऑ स्ट्रेलियन ओपन जिंकलेले नाही आणि या स्पर्धेत तो आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरीच्याच पलीकडे गेला नाही. अंतिम आठमध्ये त्याचा सामना स्थानिक आवडता खेळाडू अॅलेक्स डी मिनौर किंवा दहाव्या मानांकित अॅलेक्झांडर बुब्लिक यांच्याशी होणार आहे.