उद्योगविश्व – होनाळे ब्रदर्स नाबाद 99!

<<< अश्विन बापट

आलेपाक, आवळा मावा, लोणची, मसाले… 100 वर्षांचा होणार आता ब्रँड होनाळे! तुमच्या आमच्या जिभेचे चोचले पुरवणारे जे मराठमोळे ब्रँड सलग काही वर्षे टिकून आहेत, त्यातील एक आहे `होनाळे’ लोणची, मसाले या उत्पादनांचा ब्रँड!

व्यावसायिक वाटचालीबद्दल संजय होनाळेंना बोलतं केलं तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मूळचे कोकणातल्या उन्हाळे गावचे. काही कारणास्तव आमच्या आजोबांनी गाव सोडलं आणि ते पाच-सहा गावे सोडून असलेल्या केळवली गावात वास्तव्याला गेले. आजोबांना तीन मुलगे आणि दोन मुली, अशी एकूण पाच मुलं. पुढे वडील सात-आठ वर्षांचे असताना आमची आजी म्हणजे वडिलांची आई गेली. तेव्हा आमच्याकडे शेतजमीन नव्हती. मग चरितार्थ कसा चालवणार? म्हणून गावातले कुळीथ, कोकम असे पदार्थ भरलेलं एक बोचकं घेऊन आजोबा निघायचे आणि भाऊचा धक्का गाठायचे. तिथे आठ ते दहा दिवस आपल्याकडे असलेला माल विकायचे आणि पुन्हा कोकणात परतायचे. असं काही वर्षं सुरू होतं.”

“ताडदेवजवळील नवजीवन सोसायटीसमोरील मोतीवाला ज्युबिली बागमध्ये एक जागा त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली होती. मग लालबागलाही एक जागा घेतली. त्यांना आता आपला व्यवसाय मोठा करायचा होता. तेव्हा नुसती उत्पादनं विकण्यापेक्षा आपण काहीतरी करून बघू म्हणून माझ्या काकांनी आलेपाक तयार केला. हे आमचं पहिलं उत्पादन. ते शेजारच्या मंडळींना फार आवडलं. त्याला व्यावसायिक रूप देण्यासाठी मग आम्ही कंबर कसली. जोडीला आमची आवळा सुपारीही होतीच.

ही गोष्ट 1915 मधली आहे, जेव्हा माझे एक काका आर्यन शाळेजवळील एका गल्लीच्या तोंडावर आलेपाकचं ताट घेऊन विक्रीसाठी बसत, तर दुसरे काका ठाकूरद्वार परिसरात विक्रीसाठी जात असत. अशी दोन-तीन वर्षे गेली. 1918 उजाडलं आणि आमच्या बाबा, काकांनी ठरवलं की, आपली उत्पादनांची रेंज वाढवायची. लोणची बनवायला त्यांनी सुरुवात केली. कैरीच्या लोणच्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तोपर्यंत आम्ही गिरगावातही जागा घेतली होती. आमचा व्यवसाय आता जोर पकडू लागला होता. आंबा लोणचे, गोड लोणचे, लिंबू लोणचे असं आमच्या उत्पादनात वैविध्य यायला सुरुवात झाली. मालवणी मसाला, संडे मसाला, गोडा मसाला अशी मसाल्यांची व्हरायटीही आली. या वाटचालीत माझी आई आणि काकू यांचाही मोठा वाटा राहिलाय.

मी या व्यवसायात 1970 च्या दशकात शिरलो. आता साधारण पन्नास वर्षं मी यामध्ये सक्रिय आहे. आमचं अंधेरीत मरोळला प्रॉडक्शन युनिट आहे, जिथे पूर्ण वेळ 20 कामगार काम करतात, तर गरजेनुसार आम्ही काही रोजंदारीवरचे कामगारही घेत असतो. अंदाजे 300 उत्पादनं आम्ही तयार करतो. यामध्ये लोणची आणि मुरांब्यांचे 20 प्रकार, 40 प्रकारचे मसाले, पापडाचे 20 ते 25 प्रकार, पाच प्रकारच्या चटण्या, तांदळाचं मोदक पीठ, कुळीथ पीठ अशा वैविध्यपूर्ण उत्पादनांचा यात समावेश आहे.

आमच्या मोदक पिठालाही चांगली मागणी आहे. गणपतीच्या 10 ते 15 दिवसांत दोन ते अडीच टन मोदक पीठ विकलं जातं, तर एरवी आठवड्याला 200 किलो मोदक पीठ विक्री होते. काळानुरूप अन्य भाषिक मंडळींच्या मागणीनुसार आम्ही आमची उत्पादनं वाढवली. राजस्थानी समाजाच्या मागणीनुसार आम्ही राजस्थानी लोणचं तयार केलंय. त्यांच्या मसाल्यांमध्ये धणे, राई डाळ, लवंग, मिरीचा समावेश जास्त प्रमाणात असतो.

आमच्या आवळ्याची उत्पादनांनाही चांगली मागणी आहे. ज्यामध्ये आवळा सुपारी, बीटयुक्त आवळा मावा, मधातली आवळा कँडी, सेंद्रिय गुळातली आवळा कँडी, मोरावळा यांसारखे पदार्थ आहेत. रासायनिक रंग किंवा केमिकलचा वापर कोणत्याही पदार्थात केला जात नाही. आमची उत्पादनं मुंबईसह गुजरात, गोवा, राजस्थानमध्येही विक्रीसाठी जात असतात. याखेरीज अनेक ग्राहक वर्षानुवर्षे परदेशातही आमची उत्पादनं घेऊन जातात. तसेच आमचे पदार्थ लंडन, नेदरलँड्स, नॉर्वेमध्येही पोहोचले आहेत.

आमच्या दिवाळीच्या पदार्थांनाही नेहमीच मागणी असते. आता आमची चौथी पिढी म्हणजे माझा मुलगा आणि पुतण्याही या व्यवसायात आहे. माझ्याकडे वाशी मार्केटमधून कच्चा माल आणण्याची आणि गिरगावातील विक्री केंद्राची जबाबदारी असते. मोठा भाऊ मनोहर अकाऊंट्सची, पुतण्या प्रांजल अंधेरीतील प्रॉडक्शन युनिटची तर माझा मुलगा अभिषेक आणि पत्नी स्वातीचीही या व्यवसायात महत्त्वाची भूमिका असल्याचं गप्पांची सांगता करताना संजय होनाळेंनी सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोड्युसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)