
<<< अश्विन बापट
क्रिकेट स्कोअरर दीपक जोशी यांना या क्षेत्रातील प्रवासाबद्दल बोलतं केलं, तेव्हा ते म्हणाले, ‘मी मुंबईच्या उपनगरातील खारमध्ये भटवाडीतील साईबाबा नगरात राहायचो. गल्ली क्रिकेटचे ते दिवस होते. मीही मोठ्या उत्साहाने क्रिकेट खेळत असे. इतकंच काय, कलिनाला जाऊन टेनिस बॉल क्रिकेटही आवर्जून खेळायचो. क्रिकेटबद्दलची आवड आणि प्रेम वाढण्याची ही पहिली पायरी होती. पुढे खार जिमखान्यात एकदा डबल विकेट टुर्नामेंटच्या एका कार्यक्रमासाठी हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर येणार होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तीन ते चार तास मी तिथे थांबलो होतो.
मग 1987 ला असोसिएशन ऑफ क्रिकेट स्टॅटिस्टिशियन अँड स्कोअरर्स ऑफ इंडियाचा मी मेंबर झालो. चार वर्षांनी बॉम्बे हॉस्पिटलमधली नोकरी सुरू झाली आणि त्याच वेळी स्कोअरिंगची नवी इनिंगही. माझ्या हॉस्पिटल प्रशासनाची याकरिता मला खूप मदत झाली. त्या वेळी कांगा लीग स्पर्धेसाठी मी 1992 ला पहिल्यांदा स्कोअरिंग केलं. त्याच वर्षी बीसीसीआयची स्कोअरिंगची परीक्षा दिली. तिथून पुढे 11 कसोटी, 27 वन-डे, तर 8 टी-ट्वेन्टी सामन्यांचं स्कोअरिंग मी केलंय. याशिवाय स्कोअरिंगसाठी आयपीएलच्या 92 सामन्यांची आकडेवारी लक्षात घेतली तर एकूण सामन्यांचा आकडा 460 च्याही पुढे जातो.’
‘स्कोअररसाठी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता?’ यावर ते म्हणाले, ‘एकाग्रता हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. फलंदाज जसा डोळ्यांत तेल घालून चेंडूवर नजर ठेवून फलंदाजी करत असतो, तसंच आम्हालाही प्रत्येक चेंडूवर अत्यंत बारकाईने नजर ठेवावी लागते. पूर्वी हाताने लिहिण्याचं स्कोअरिंग होतं. आता डिजिटल रूप आल्याने लॅपटॉप, आयपॅडवर स्कोअरिंग होत असतं. पण एकाग्रतेची, पातळी तितकीच उच्च लागते. तुम्हाला सामन्यामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतून चालत नाही. मग तुमचा संघ जिंकत असो वा हरत असो. तुम्हाला तुमचं काम चोखच बजावावं लागतं. काही वेळा चार-पाच दिवसांच्या सामन्यांमध्ये एखादा सामना अत्यंत कंटाळवाण्या स्थितीत असेल किंवा संथ चालला असेल तरीही तुम्हाला तितक्याच समर्पित वृत्तीने स्कोअरिंग करावं लागतं. तसंच कमालीचा संयम तुमच्याकडे असणं गरजेचं असतं.’
‘कारकीर्दीतील यादगार सामना कोणता?’ हे विचारलं असता ते म्हणाले, ‘2011 चा विश्वचषक अंतिम सामना तसंच सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असे वानखेडे स्टेडियवर झालेले दोन सामने माझ्या चांगलेच लक्षात आहेत.
2011 मधील त्या फायनल मॅचनंतर सचिन तेंडुलकरला मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेटलो होतो आणि त्याच्या सोबत फोटोही काढला होता. त्याला मी गणपती बाप्पांची मूर्ती भेट दिली होती, तर रोहित शर्माला यंदा आयपीएलच्या एका मॅचच्या वेळी भेटलो असता “मैं जानता हूँ, आप कई सालों से स्कोअरिंग करते है…’’ अशी कॉम्प्लिमेंट त्याने मला दिली. तेव्हा मला माझ्या इतक्या वर्षांच्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान लाभलं.
या स्कोअरिंगदरम्यान काही सामन्यांचा, काही भेटींचा अनुभव मी विसरू शकत नाही. 2016 मध्ये हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यातली टी-ट्वेन्टीची सेमीफायनल हीदेखील माझ्या चांगलीच लक्षात राहिलीय. तसंच 1994 मध्ये विंडीजचे महान गोलंदाज ज्योएल गार्नर यांची भेट घेतली होती. अशा काही दिग्गजांच्या भेटीही माझ्या चांगल्याच लक्षात राहिल्यात.’ या क्षेत्रातल्या आर्थिक गणिताबद्दल ते म्हणाले, ‘आम्ही 1996 ला 100 रुपये प्रतिदिन मानधनावर सुरुवात केली होती, आज स्थानिक सामन्यासाठी प्रतिदिन सुमारे दीड ते अडीच हजार, तर प्रतिदिन आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 15 हजारांच्या घरात इतकं मानधन मिळतं. तसंच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने स्कोअरर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,’ असाही मानस जोशी यांनी व्यक्त केला.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)