
<<< संजय मेस्त्री
व्यंगचित्रे रेखाटणे ही रेखाटणाऱ्यांच्या मनावर ताण आणणारी कला आहे. सतत विचार करून नवनवीन कल्पना रेखाटणे ही सोपी गोष्ट नाही. स्वतः तणावरहीत राहणे, आनंदी राहणे ही तर आणखी कठीण गोष्ट. ही कला फार थोड्या कलाकारांना जमते. त्यासाठी कलाकार जीनियस असावा लागतो. त्या जीनियस कलाकारांमध्ये शि. द. फडणीस हे नाव महत्त्वाचे आहे. ते या 29 जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण करीत आहेत. या वयातही तरुणासारखा उत्साह आहे, स्मरणशक्ती तल्लख आहे. नियमित योगासने करून त्यांनी स्वतःला निरोगी आणि कलायोगी बनवले आहे.
शि. द. फडणीस कलाकार म्हणून जेवमोठे आहेत, तेवच किंबहुना, त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे आहेत. मुखपृष्ठावरून व्यंगचित्रे पाहण्याची आवड जशी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मार्मिक’ने लावली तशीच आवड शि. द. फडणीस यांच्या ‘मोहिनी’ मासिका-वरील, दिवाळी अंकावरील हास्यचित्रांनी लावली. आकर्षक रंग, हमखास हसविणारी बोलकी कल्पना यामुळे अनेकांनी त्यांची व्यंगचित्रे संग्रही ठेवली. शालेय शिक्षणात गणितासारखा कठीण विषय सोपा करून बघण्याचे महाराष्ट्र शिक्षण खात्याने ठरवले तेव्हा त्यांनी शि. द. फडणीस यांना चित्रे कायला सांगितली. अतिशय कठीण काम होते. शिक्षण खात्याने ती चित्रे वेगवेगळ्या जिह्यांत दाखवून पाहिली, प्रयोग करून पाहिला. तो प्रयोग यशस्वी झाला. गणित हा कठीण विषय शिदंनी रेषांतून सोपा केला. शिक्षण खात्याने मग त्यांना इतर वर्गातील गणित विषय चित्रांतून सोपे करायला सांगितले. तेही आव्हान शिदंनी यशस्वीपणे स्वीकारले.
कोल्हापूरला पहिले व्यंगचित्रकार संमेलन साधारण चाळीस वर्षांपूर्वी झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. ते संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या व्यंगचित्र प्रात्यक्षिकाने व्यंगचित्रकारांनी गाजवले होते. त्यात शि. द. फडणीस आणि ज्ञानेश सोनार आघाडीवर होते. शि. द. एखादे मुखपृष्ठ रेखाटतात तेव्हा त्यांना एखादे पेंटिंग करण्यास वेळ लागतो. शि. द. फडणीस लेखकांच्या नजरेतून पाहत असतात. त्यांची हास्यचित्रे पाहिली तर आपल्याला कळते की, रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगावर त्यांनी हास्यचित्रे रेखाटली आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तकातील पात्रे आपल्यालाही भेटलेली असतात. म्हणूनच वाचताना आपल्याला पुनर्प्रत्ययाचा आनंद ही पात्रे देतात. शि. द. यांची हास्यचित्रे नेमके तेच काम करतात. काळाच्या ओघात इतक्या वर्षांत चित्रे कायाची माध्यमे बदलली. ब्रश, रंगाची जागा डिजिटल माध्यमाने घेतली. यात एकच गोष्ट टिकून राहिली, लोकप्रिय राहिली आणि ती म्हणजे शि. द. फडणीस यांची बहारदार हास्यचित्रे! ‘हसरी गॅलरी’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी देशभर, जगभर प्रवास केला, लोकांचे मनोरंजन केले. मुखपृष्ठ काझाल्यावर त्याचे करायचे काय? हा प्रश्न त्यांना पडला नाही. माईणकर आणि असगेकर या दोन मित्रांनी त्यांना या चित्रांचे प्रदर्शन भरवायची कल्पना दिली. महाराष्ट्रातील अनेक शहरांतून अनेक दिवस हे प्रदर्शन झाले. काही शहरांतून पुन: पुन्हा झाले. प्रत्येक वेळी दाद मिळत गेली. त्याव्यतिरिक्त ज्यांनी जुनी मुखपृष्ठे पाहिली नाहीत, त्यांच्यासाठी त्यांनी स्लाईड शो बनविला. त्यांच्या प्रदर्शनातील काही चित्रे थ्रीडी आहेत, हालचाल करणारी आहेत. ही कल्पनासुद्धा नावीन्यपूर्ण आहे.
कार्टुनिस्ट्स कंबाईन ही व्यंगचित्रकार संस्था शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे 1983 साली त्या वेळी नावाजलेल्या व्यंगचित्रकारांच्या उपस्थितीत केली. ते या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर शि. द. फडणीस अध्यक्ष झाले. बाळासाहेब ठाकरे राजकारणात व्यस्त झाल्यामुळे शि. द. फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये पूनम हॉटेलमध्ये मीटिंग होत असत. कार्टुनिस्ट्स कंबाईनची स्थापना झाल्यापासून आजतागायत शि. द. फडणीस मार्गदर्शन करत असतात. कार्टुनिस्ट्स कंबाईनचा कोणताही कार्यक्रम बाळासाहेब आणि शि. द. यांनी चुकवला नाही. असा हा सोप्या रेषेत हास्यचित्रे रेखाटणारा दिलखुलास व्यंगचित्रकार वयाची शंभरी पूर्ण करत आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा!