टोकियो जिंकणाऱया नेमबाज अवनी लेखराने पॅरिसमध्येही सोनेरी कामगिरी करत इतिहास रचला. पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱयाच दिवशी अवनीच्या सुवर्णासह मोना अगरवाल, धावपटू प्रीती पालने कांस्य तर नेमबाज मनीष नरवालने रौप्य जिंकत हिंदुस्थानला चार पदकांची कमाई करून दिली. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या महापथकाला एकही सुवर्ण जिंकता आले नव्हते, पण दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिकच्या दुसऱयाच दिवशी सुवर्ण स्पर्श करत स्टेडियममध्ये ‘जन गण मन’चे सूर घुमवले.
दोन पदके अजून बाकी आहेत…
माझी मोहीम एका सुवर्णावर नक्कीच थांबणार नाही. माझ्या दोन स्पर्धा बाकी आहेत आणि त्यात मला पोडियमवर यायचेय. पदकासाठी खूप संघर्ष करावा लागला. अत्यंत अटीतटीची लढत होती. स्टेडियममध्ये ‘जन गण मन’चे सूर वाजल्यामुळे मला अत्यानंद झालाय. उर्वरित दोन्ही स्पर्धेत देशासाठी आणखी पदके आणायची आहेत. सध्या त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलेय.