जेवणानंतर ‘या’ गोष्टी टाळल्याने होतो शरीराला फायदा… वाचा सविस्तर…

4859
सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे.

जेवणानंतर प्रत्येकाला काही प्रमाणात सुस्ती येते. मात्र, जेवणानंतर लगेच झोपणे टाळण्याची गरज आहे. तसेच बऱ्याच जणांना जेवणानंतर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. मात्र, जेवणानंतर लगेचच चहा-कॉफी घेणे शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे जेवणानंतर काही गोष्टी टाळणे शरीरासाठी आवश्यक आहे.

जेवण झाल्यावर लगेचच चहा-कॉफी घेतल्याने पचनक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे भूख न लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेवणापूर्वी एक तास किंवा जेवणांनतर एका तासाने चहा-कॉफी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात. फळांचे सेवन रिकाम्यापोटी करण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, जेवणानंतर फळे खाणे टाळणे गरजेचे असते. जेवणानंतर पोट भरलेले असल्याने फळे घेतल्याने त्यांचे पचन नीट होत नाही. त्यामुळे त्यातील आवश्यक जीवनसत्त्वे शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे दोन जेवणांमध्ये किंवा हलकी भूक असताना फळांचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. जेवणामध्ये थोडे थोडे पाणी घेतल्याने पचनक्रियेला मदत होते. मात्र, जेवणानंतर लगेचेच पाणी किंवा थंडपाणी घेणे टाळावे. जेवणानंतर घेतलेले पाणी यकृतात साठते. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. जेवण झाल्यावर 45 मिनिटांनी कोमट पाणी घेतल्यास त्याचा शरीराला फायदा होतो.

जेवणानंतर मद्यपान किंवा धुम्रपान टाळणे गरजेचे आहे. जेवणानंतर लगेचच धुम्रपान केल्यास इरिटेबल सिंड्रोम नावाचा आजार होण्याची शक्यता असते. तसेच अल्सर होण्याचा धोकाही असतो. जेवणानंतर एक सिगरेट घेतली असता, 10 सिगरेटमुळे होणारे नुकसान त्यामुळे होते, असे संशोधनातून दिसून आले आहे. जेवणानंतर मद्यपान केल्यास पचनक्रिया मंदावण्याबरोबर आतड्यांवरही परिणाम होतो. तसेच जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ करणे टाळण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला आहे. आंघोळ केल्यानंतर शरीराचे तापमान कमी होते. ते नियंत्रित करण्यासाठी रक्ताभिसरण क्रिया वाढते. त्यामुळे रक्ताभिसरणाची पचनासाठी होणारी मदत कमी होते. त्यामुळे जेवणानंतर आंघोळ करणे टाळावे.

जेवणानंतर येणारी झोप टाळणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दिवसभराचा थकवा आणि भरपेट जेवण यामुळे झोप अनावर होते. तसेच जेवणात एखादा गोड पदार्थ असले तर झोप डोळ्यावर येते. झोप कितीही अनावर झाली तरीही जेवणानंतर एका तासाने झोपण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जेवण झाल्यावर शतपावली करणे, काही वेळ व्रजासनात बसण्याचा फायदा होतो. मात्र, जेवणानंतर लगेचच झोपल्यास पोटात जळजळ, घोरण्याची समस्या, अवेळी जाग येणे, स्वप्न पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवणानंतर या काही गोष्टी कटाक्षाने टाळल्यास आरोग्याला त्याचा फायदा होईल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या