सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच येण्याची शक्यता,अयोध्येत सुरक्षा वाढविली

398
प्रातिनिधिक फोटो

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या गुरुवारी (दि. 17) अंतिम सुनावणी होणार आहे. या प्रकरणी लवकरच निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम-144 लागू (जमावबंदी आदेश) करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

दसऱ्याच्या सुट्टीनंतर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 6 ऑगस्टपासून 38 दिवस सुनावणी झाली आहे. 17 ऑक्टोबरला याबाबत अंतिम सुनावणी होईल. तोपर्यंत या प्रकरणातील पक्षकारांनी आपली बाजू न्यायालयापुढे मांडावी, असे सरन्यायाधीश गोगोई यांनी जाहीर केले आहे.

10 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू
अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी अनुजकुमार झा यांनी कलम-144 (जमावबंदी आदेश) लागू करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. 10 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश असेल. चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. सार्वजनिक सभा, चर्चा घेता येणार नाहीत. जातीय सलोखा राखण्यासाठी अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असे झा यांनी स्पष्ट केले.

सरकारी परवानगीशिवाय दिवाळीत फटाके खरेदी नाही
दहा दिवसांनंतर दिवाळीचा सण आहे. परंतु अयोध्येतील नागरिकांना या वर्षी फटाके उडवता येणार नाहीत. फटाके विकत घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच ड्रोन कॅमेरा, व्हिडीओ शूटिंगलाही 10 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आल्याचे न्यायदंडाधिकारी झा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या