बाबरीच्या वास्तूवर संस्कृत शिलालेख; रामलला विराजमानचा युक्तीवाद

757
supreme-court-of-india

सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीप्रकरणाच्या मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बाबरीच्या वास्तूवर संस्कृत शिलालेख असल्याचा दावा रामलला विराजमानच्या वकिलांनी केला. यासाठी त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) अहवालाचा दाखलाही दिला आहे. या अहवालाचा दाखल देत बाबरी निर्माणासाठी हिंदू मंदिर पाडण्यात आल्याचे स्पष्ट होते, असेही वकिलांनी म्हटले आहे. या संस्कृत शिलालेखांवर मगर आणि कासवाच्या आकृती आहेत, त्याचा मुल्सीम संस्कृतीशी काहीही संबंध नाही, असेही वरिष्ठ अधिवक्ते सी.एस. वैद्यनाथन यांनी न्यायालयात सांगितले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावेळी रामलला विराजमानने एएसआयचा दाखला देत राममंदिर असल्याचा दाव्याला बळ दिले आहे. रामजन्मभूमीबाबतची हिंदू समाजाची आस्था आजही कायम आहे. मंदिर पाडून तिथे बाबरी निर्माण करण्यात आली तरीही येथील पूजा- अर्चनेत खंड पडला नाही. भाविक मोठ्या संख्यने येथे दर्शनासाठी येतात. पुरातत्त्व खात्याच्या अहवालानुसार न्यायालयासमोर असलेल्या दस्तावेजातून विवादित जागेत राममंदिर असल्याचे स्पष्ट होते, असेही वैद्यनाथन म्हणाले. तसेच अयोध्या हेच प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. शिलालेखावर संस्कृत भाषेतील मजकूर असून त्यावर साकेतमधील राजा गोविंदचंद्र यांचे नाव आहे. त्यावर हे विष्णु मंदिर असल्याचाही उल्लेख आहे. या शिलालेखावर कासव, मगर यांच्या आकृती आहेत, या आकृतीचांही मुस्लीम संस्कृतीशी संबंध नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

वैद्यनाथन यांनी न्यायालयात एका वार्ताहराचे वृत्तांकन वाचून दाखवले. त्यात वार्ताहराने शिलालेख पाहिला असून पोलिसांनी तो शिलालेख ताब्यात घेतला आहे, असे सांगितले. हा शिलालेख पश्चिमेच्या भिंतीवर होता. हा शिलालेख वादग्रस्त जागेतच सापडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एएसआयच्या अहवालावरून विवादित जागेत विशाल राममंदिर होते. बाबरी निर्माणासाठी ते पाडण्यात आले आणि त्या ढाच्यावरच बाबरी उभारण्यात आली हे स्पष्ट होत, असेही वैद्यनाथन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या